डेहराडून : उत्तराखंडमधील ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे भीषण बस अपघात झाला. हरिद्वारहून कर्णप्रयागच्या दिशेने जाणारी प्रवासी बस पुलावरून खाली ओढ्यातील खोल दरीत कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला, तर २६ प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी झालेल्या बोलेरोच्या अपघातात ४ जण ठार झाले तर ६ जण जखमी झाले. (At least eight people were killed, and 26 were injured after a bus travelling from Haridwar to Karnaprayag fell into a stream off the Rishikesh-Badrinath national highway.)
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ सेवा कंपनीची ही बस पहाटे सुमारे ३.३० वाजता हरिद्वारहून रवाना झाली होती. त्यानंतर अवघ्या तासाभरातच ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर हा भीषण अपघात घडला. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पुलावरून खाली कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या दुर्घटनेत सात प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या आणखी एका प्रवाशाचा ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ब्यासी आणि ढालवाला येथे तैनात असलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अतिरिक्त पथकेही तैनात करण्यात आली असून, पोलिसांकडूनही मदतकार्य सुरू आहे.
अपघातातील २६ जखमी प्रवाशांना बाहेर काढून ऋषिकेशमधील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये झारखंड, बिहार, उत्तराखंड, आसाम, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रवाशांचा समावेश आहे. यामध्ये गुवाहाटी येथील तीन वर्षांच्या बालिकेसह हल्द्वानी येथील ६४ वर्षीय महिलेचाही समावेश आहे. एका प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बृजेश भट्ट यांनी अपघाताच्या माहितीला दुजोरा दिला असून, बचावकार्य सुरू असल्याचे सांगितले.
रुद्रप्रयागमध्येही वाहन दरीत कोसळून चौघांचा मृत्यू
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी आणखी एक भीषण अपघात घडला. लग्नसमारंभ आटोपून गावाकडे परतणारे दहा जण बोलेरो वाहनातून प्रवास करत असताना चालकाचे नियंत्रण सुटून वाहन सुमारे ५०० मीटर खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले.
बन्सवाडा-कंदारा मोटार मार्गावर हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती प्रतिसाद दल, एसडीआरएफ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधार आणि डोंगराळ भागातील खडकाळ परिस्थितीमुळे बचावकार्यात अडथळे आले. तरीही पथकांनी रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू ठेवले. सलग दोन दिवसांत घडलेल्या या दुर्घटनांमुळे उत्तराखंडच्या डोंगराळ रस्त्यांवरील प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


