रत्नागिरी : शांत आणि निसर्गरम्य शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीत अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीचे प्रकार समोर येत आहेत. चरस, गांजा आणि ब्राऊन शुगरसारख्या अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने ब्राऊन हेरॉईन (टर्की) विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली. (Ratnagiri drug sale case two arrested). त्यांच्याकडून ४ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसह एकूण २ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रत्नागिरी शहर आणि परिसरात अमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी एलसीबीचे पथक शहर परिसरात गस्त घालत असताना कोकणनगर ते शिवरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अजिजा बिल्डिंगजवळ दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरताना आढळल्या. पोलिसांना पाहताच त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने तत्काळ त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बाळगलेले ४ ग्रॅम वजनाचे ब्राऊन हेरॉईन (टर्की) आढळून आले. या अंमली पदार्थाची स्थानिक बाजारपेठेतील किंमत ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेले अन्य साहित्यही पोलिसांनी जप्त केले. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ४० हजार रुपये आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे नायाब इरफान खलपे (वय २७, रा. कीर्तीनगर, मजगाव रोड, रत्नागिरी) आणि अरबाज अबरार फकीर (वय ३०, रा. उक्ताड, फकीर मोहल्ला, चिपळूण) अशी आहेत. प्राथमिक तपासात हे दोघे रत्नागिरी शहरात अमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने एकत्र आल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले. हे अंमली पदार्थ नेमके कोठून आणण्यात आले होते आणि शहरात कोणाला विक्री केले जाणार होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग गोरे, हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, वैभव मोरे, गणेश सावंत आणि अतुल कांबळे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाच्या पुढील तपासातून अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


