गोवा : २४ समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धनाच्या प्रस्तावामुळे चिंता

प्रस्तावानुसार उत्तर गोव्यातील १० आणि दक्षिण गोव्यातील १४ समुद्रकिनाऱ्यांचा समावेश किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) अधिसूचना २०१९ अंतर्गत कासवांच्या अंडी घालण्याच्या क्षेत्रांत करण्यासाठी पर्यावरण खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
गोवा : २४ समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धनाच्या प्रस्तावामुळे चिंता

म्हापसा : गोव्यातील २४ समुद्रकिनारे ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंडी घालण्याच्या जागा म्हणून घोषित करण्याच्या वनखात्याच्या प्रस्तावामुळे किनारपट्टीवरील व्यवसाय आणि पारंपरिक रोजगारावर होणाऱ्या परिणामांबाबत राज्यभर चिंता व्यक्त होत आहे. उत्तर गोव्यातील शॅक्स व्यावसायिक आणि मच्छीमारांनी या प्रस्तावामुळे लागू होणाऱ्या संभाव्य निर्बंधांबाबत सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

या प्रस्तावानुसार उत्तर गोव्यातील १० आणि दक्षिण गोव्यातील १४ समुद्रकिनाऱ्यांचा समावेश किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) अधिसूचना २०१९ अंतर्गत कासवांच्या अंडी घालण्याच्या क्षेत्रांत करण्यासाठी पर्यावरण खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या निर्णयामुळे विशेषतः कासवांच्या अंडी घालण्याच्या हंगामात समुद्रकिनाऱ्यांवरील विविध व्यवसायांवर कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

ऑलिव्ह रिडले या संकटग्रस्त कासवांचे आणि त्यांच्या अंडी घालण्याच्या ठिकाणांचे संरक्षण महत्त्वाचे असल्याचे मान्य करतानाच, प्रस्तावित नियमांमुळे पर्यटन व्यवसाय आणि पारंपरिक मासेमारीवर परिणाम होण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

शॅक्स ओनर्स वेल्फेअर सोसायटीचे सचिव जॉन लोबो म्हणाले की, राज्यातील २४ समुद्रकिनारे कासव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केल्यास केवळ शॅक्स व्यावसायिकांनाच नव्हे, तर संपूर्ण पर्यटन उद्योगाला आणि त्यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या रोजगाराला फटका बसेल. आमचा कासव संवर्धनाला विरोध नाही. मात्र, पर्यटन हंगामात एवढ्या मोठ्या संख्येने समुद्रकिनारे कासव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करणे व्यावहारिक नाही. कासवांचे वास्तव्य असलेल्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे संरक्षण व्हावे; मात्र त्यासाठी स्थानिकांचे रोजगार आणि पर्यटन व्यवसाय विस्कळीत होऊ नयेत.

शॅक्स ओनर्स वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष क्रूझ कॉर्दोझ यांनी पारंपरिक गोमंतकीय किनारी व्यवसाय बंद पाडून बाहेरील लोकांना, विशेषतः दिल्लीतील व्यावसायिकांना किनारपट्टीवरील व्यवसाय ताब्यात घेण्यासाठी हा प्रस्ताव आणला जात असल्याचा आरोप केला. किनारी पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिक गोमंतकीयांचा व्यवसाय संपविण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो, असे ते म्हणाले.

मच्छीमार फ्रान्सिस्को फर्नांडिस ऊर्फ पेले म्हणाले की, कासवांच्या अंडी घालण्याच्या ठिकाणांचे संरक्षण आवश्यक आहे. मात्र, कासवांच्या अंडी घालण्याच्या प्रक्रियेला खरोखर बाधा आणणारे उपक्रम आणि अनेक पिढ्यांपासून सुरू असलेल्या पारंपरिक व्यवसायांमध्ये फरक केला पाहिजे. “या प्रस्तावामुळे पारंपरिक रापण पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचा व्यवसाय संपुष्टात येईल,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

उत्तर गोव्यातील प्रस्तावित किनारे : मोरजी, मांद्रे, वागातोर, कळंगुट, कांदोळी, केरी, मिरामार, आश्वे, बागा आणि हरमल.

दक्षिण गोव्यातील प्रस्तावित किनारे : राजबाग, मोबोर, काब दि राम, पाटणे, बायणा, पाळोळे, खोला, कार्मोणा, केळशी, वार्का, तळपण, आगोंद आणि गालजीबाग.

या प्रस्तावामुळे नेमके कोणते निर्बंध लागू होणार, ते केवळ कासवांच्या अंडी घालण्याच्या हंगामापुरते असतील की वर्षभर लागू राहतील आणि सध्याचे पर्यटन व मासेमारीचे व्यवसाय नियमनाखाली सुरू ठेवता येतील का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.