कोरगाव : पेडणे तालुक्यात गव्यांचा उपद्रव वाढला आहे. इब्रामपूर येथे गव्यांनी केलेल्या हल्ल्यात अजित हरी गावस यांच्या मालकीच्या दोन गाई जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Ibrampur-Pernem; two cows injured in gaur attack).
गव्यांचा मानवी वस्त्यांमधील वावर वाढत आहे. त्यातच पाळीव जनावरांवरही हल्ले होऊ लागले आहेत. हल्ल्यांच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या वाढत्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी वन खात्यासह संबंधित प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी चिंतित शेतकऱ्यांनी केली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि पाळीव जनावरांचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ओंकारनंतर गव्यांचा उपद्रव
पेडणे तालुक्यातील काही भागांत अधूनमधून ‘ओंकार’ हत्ती दाखल होऊन पिंकाचे नुकसान करीत असतो. बरेच दिवस वास्तव्य करून राहणारा हा हत्ती येथील लोकांना जास्त करून शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. त्यात भर म्हणून मानवी वस्तीत येणारे गवे गुरांवर हल्ले करू लागल्याने शेतकरी व स्थानिकांचीही चिंता वाढली आहे. उद्या गवे लहान मुले किंवा लोकांवरही हल्ला करू शकतात. त्यामुळे वेळीच त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागरी स्थानिक लोकांनी केली आहे.


