पणजी : दै. ‘गोवन वार्ता’च्या ‘हुप्पा हुय्या’ बालविशेषांक आयोजित प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या राज्यस्तरीय चित्रकला महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माझा सुंदर गाव’ हा या स्पर्धेचा विषय असून राज्यातील विद्यार्थ्यांना आपली कलात्मक प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला १० हजार रुपये, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये आणि चषक व प्रशस्तीपत्र देण्यात येईल. याशिवाय गोव्यातील १२ तालुक्यांमधून प्रत्येकी एका विजेत्याला २ हजार रुपये, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
स्पर्धेसाठी नियम
स्पर्धेत केवळ पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनाच सहभागी होता येईल. प्रत्येक शाळेला जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांची चित्रे पाठवता येतील. चित्रांसोबत मुख्याध्यापक किंवा प्रभारी शिक्षकांची स्वाक्षरी, शाळेचा शिक्का आणि चित्र विद्यार्थ्याने शिक्षकांसमोर काढल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो पाठवावा लागेल.
चित्रासोबत विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव, गाव, पिन कोड आणि पालकांचा संपर्क क्रमांक असा संपूर्ण पत्ता मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत नमूद करणे बंधनकारक आहे.
स्पर्धकांनी ए-४ आकाराच्या कागदावरच चित्र काढणे आवश्यक आहे. चित्रासाठी रंगांच्या वापरावर कोणतेही बंधन नाही. मात्र, ए-४ आकारात नसलेली चित्रे स्वीकारली जाणार नाहीत.
३० नोव्हेंबर अंतिम तारीख
स्पर्धकांची चित्रे शाळेमार्फत ‘गोवन वार्ता’च्या पणजी कार्यालयात प्रत्यक्ष आणून जमा करता येतील. चित्रे पाठविण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२६ आहे. चित्रे पाठविण्याचा पत्ता : दै. ‘गोवन वार्ता’, तिसरा मजला, कामत मेट्रोपॉलिस, सांतईनेज, पणजी, गोवा - ४०३००१.


