पणजीः गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीला (एसटी) (ST reservation) राजकीय आरक्षण देण्याची मागणी घेऊन आदिवासी समाजाचे आंदोलन रविवारी जास्त प्रखर झाले. या मागणीसाठी काढलेली मशाल मोर्चा कुंभारजुवेतून करमळी येथे पोहोचला. या वेळी २०० पेक्षा जास्त आदिवासी बांधवांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आंदोलन जास्त प्रखर करण्याचा निर्धार केला.
गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाला एकत्र आणून राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी जनजागृती करणे हा या मोर्चाचा हेतू होता. या आंदोलनाला ‘आमी गोंयचे राखणदार’चे (एजीआर) अध्यक्ष रामा काणकोणकर यांनी भाजप सरकारवर राजकीय आरक्षण जाणिवपूर्वक लांबणीवर टाकून काही विद्यमान आमदारांचे हित सांभाळण्याचा आरोप केला.
तसेच, आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी राखून ठेवलेल्या निधीचा योग्य विनियोग झाला नसल्याने गेल्या चार वर्षांत समाजाला ६, ५०० कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. गोव्याचे अनुुसूचित जमातीचे निमंत्रक रुपेश वेळीप यांनी एसटी राजकीय आरक्षणासंबधीत कायद्याच्या वैद्यतेला आव्हान देण्याच्या एडविन फर्नांडिस यांनी दाखल केलेल्या याचिकेवर चिंता व्यक्त केली.
राजकीय हस्तक्षेपामुळे आरक्षणाची अंमलबजावणी अडखळते, असा आरोप करून आरक्षण लागू करण्यासंदर्भातील अंतिम अधिसूचना जारी करण्याची मागणी त्यांनी केली. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आदिवासी महिला नेत्या हर्षा वाडकर यांनी गोव्यात अनुसूचित क्षेत्रांची अधिसूचना जारी करण्याची मागणी केली. इतर वक्त्यांनी आदिवासी समाजाच्या जमिनीचे हक्क, कुळ आणि मुंडकार प्रकरणांविषयी समस्या मांडल्या.
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात जनजागृती बैठका घेणे आणि राज्यव्यापी आंदोलन जास्त प्रखर करण्याचा निर्धार यावेळी केला. राजकीय आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार अपयशी ठरल्यास भाजप सरकारला निवडणुकीत प्रश्न विचारणार असा इशारा आंदोलकांनी दिला.


