कार्यक्रमात बोलताना सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके. सोबत सौरव दास, आशुतोष रांका आणि अमरीन शेख. (नारायण पिसुर्लेकर)
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
विधानसभा निवडणुकीसाठी सीजेपी (कॉकरोच जनता पार्टी) नागरिकांचा जाहीरनामा (सिटिझन मॅनिफेस्टो) तयार करणार आहे. जमिनींचे रूपांतरण रोखण्यासाठी कलम ‘३९ अ’ रद्द करण्याची प्रमुख मागणी यामध्ये असेल, असे सीजेपीने स्पष्ट केले. सीजेपीचे संघटक अभिजित दिपके तसेच इतर सदस्यांनी ‘गोंयांत चल्लां कितें’ या कार्यक्रमाद्वारे लोकांशी संवाद साधला.
पणजीत झालेल्या या कार्यक्रमात ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, पणजीचे नगरसेवक जॅक सुखिजा, तसेच इतर नागरिक उपस्थित होते. दिपके पुढे म्हणाले, निवडणूक लढवणे हा सीजेपीचा हेतू नाही. तरुणांचा उल्लेख विनोदाने ‘कॉकरोच’ (झुरळ) असा केला गेला होता. या वक्तव्याचे रूपांतर गंभीर प्रश्नांवरील आंदोलनात झाले. भ्रष्टाचारावर वचक ठेवण्यासाठी स्वतंत्र गटाची आवश्यकता आहे. एकटी व्यक्ती यंत्रणेत बदल घडवू शकत नाही, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन बदल घडवायला हवा. शांतता आणि अहिंसा या तत्त्वांवर देशाची उभारणी झाली आहे. महात्मा गांधी देशाचा आत्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कणा, तर पं. जवाहरलाल नेहरू मन आहेत. भाजप धर्मांमध्ये फूट पाडून देशाचा एकोपा नष्ट करण्यास खतपाणी घालत आहे. सीजेपी कधीच भाजपच्या विचारसरणीला पाठिंबा देणार नाही.
जमीन हडपमुळे गोवा ओळख गमावत आहे
जमीन हडप करण्याचे प्रकार गोव्याची ओळख आणि वेगळेपण नष्ट होण्याचे मूळ कारण आहे. भूमाफियांना हाताशी धरून राजकारणी जमिनी बळकावत आहेत. नगरनियोजन कायद्याचे कलम ‘३९ अ’ रद्द व्हावे, ही सीजेपीची प्रमुख मागणी असेल.
पर्यटनाचा गोमंतकीयांना लाभ नाही
पर्यटन हा गोव्याचा मुख्य व्यवसाय आहे. पर्यटनाचे व्यवसाय बाहेरील लोकांकडे आहेत. या व्यवसायातील रोजगारही गोमंतकीयांना मिळत नाहीत. त्यामुळे पर्यटनाचा गोमंतकीयांना हवा तसा फायदा होत नाही, असे अभिजित दिपके यांनी सांगितले.


