मडगावच्या दिंडी उत्सवासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणार !

मुख्यमंत्री डॉ. सावंत : मडगावातील दिंडी सोहळ्यास प्रारंभ

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
just now
मडगावच्या दिंडी उत्सवासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणार !

मडगाव : मडगावच्या ११७ वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री विठ्ठल रखुमाई दिंडी उत्सवाला राज्य सरकारने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. या उत्सवासाठी येणार्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास सरकार कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 

या महोत्सवासाठी भाविकांना आवश्यक सुविधा उभारण्यात येतील. पार्किंगसह अन्य समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. ११७ वर्षांपूर्वी सुरू झालेली भक्ती आणि परंपरेचा हा वारसा आजही तितक्याच उत्साहाने पुढे सुरू आहे. राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे या उत्सवाचे महत्त्व आणखी वाढले आहे. दिंडी समिती आणि मडगावकरांच्या सहकार्याने भविष्यातही आवश्यक विकासकामे हाती घेतली जातील. पंढरपूरच्या वारीला जाण्यासाठी भाविकांमध्ये जसा उत्साह असतो, त्याच भक्तिभावाने गोव्यातील नागरिक मडगावच्या दिंडी उत्सवात सहभागी होतात. ही परंपरा गोव्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. गोव्यात सुख-समृद्धी नांदावी आणि गोमंतकीयांची सेवा करण्याची सदैव संधी मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठलाच्या चरणी केली. 

यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार उल्हास तुयेकर तसेच श्री हरिमंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. देवस्थान समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

राज्य दिंडी महोत्सव समिती आणि श्री हरिमंदिर देवस्थान मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मडगाव येथील हरिमंदिराच्या ११७ व्या दिंडी उत्सवाच्या मुख्य दिंडी सोहळ्याची सुरुवात रविवारी झाली.             

दिंडी उत्सवाच्या निमित्ताने रविवारी पहाटे पंचामृत अभिषेक, भजन कार्यक्रम, सायंकाळी महाराष्ट्र व कर्नाटकातील वारकरी संप्रदायांचे भजन झाले. सायंकाळी श्री विठ्ठल रखुमाई उत्सवमूर्तीची रथात स्थापना करण्यात आली. यावेळी मंत्री दिगंबर कामत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह सुहास कामत व मंदिराच्या समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. दिंडीच्या उद्घाटनानंतर श्री हरिमंदिर मंडपात गायनाची पहिली बैठक लातूरच्या आसावरी बोधनकर जोशी व धनंजय जोशी यांची सादर झाली. श्री दामोदर बोगदेश्वर दिंडी पथक वास्को व अन्य वारकरी भजनी मंडळांच्या सहभागाने दिंडी रथाचे श्री हरिमंदिरातून प्रस्थान झाले.             

यावेळी दामू नाईक यांनीं सांगितले की, मडगावच्या हरिमंदिरातील दिंडी महोत्सवाला ११७ वर्षांचा वारसा आहे. ही दिंडी पोर्तुगीज काळातही सुरू होती व अजूनही हरिभक्तीचा जागर अजूनही सुरू आहे.

२३ नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रम

कार्तिकी महाएकादशीनिमित्त हा दिंडी महोत्सव २३ नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा