म्हापसा : गोगरेमवाडा, आसगाव येथे धावजेकर यांच्या बंगल्यातील बांबू व गवतापासून हातकाम सजावटीच्या दुकानाला भीषण आग लागून चार कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यातील रत्नेश चव्हाण (वय, १९, मोयरा येथील रहिवासी, मूळ उत्तरप्रदेश) या युवकाचा गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. (Asgaon : Youth dies after being burned in fire).
१० नोव्हेंबर रोजी वरील आगीची घटना घडली होती. त्यानंतर गंभीर जखमी स्थितीत त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. आगीत होरपळून ९० टक्के हा युवक भाजला होता व त्याची प्रकृती चिंताजनक होती. गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपुरी ठरली व अखेरचा श्वास घेतला.
या घटनेत त्याच्याबरोबर आणखी तिघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत. आगीत दुकानातील साहित्य व तीन दुचाकी भस्मसात झाल्या होत्या. एका कार गाडीचेही नुकसान झाले होते.
दुर्घटनेनंतर दुकाना समोरील फा. आग्नेल शिक्षण संस्थेतील विद्यार्थी बाहेर पडत असताना त्यांच्या हा आग लागल्याचा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी तिथे धाव घेतली होती. आणि सरपंच हनुमंत नाईक व रहिवास्यांसोबत मदतकार्य हाती घेतले.
आपतकालीन यंत्रणांची वाट न पाहता त्यांनी शिक्षण संस्थेतील फायर एस्टींग्यूशर आणून बचावकार्य हाती घेत दुकानात सापडलेल्या तीन जखमींना बाहेर काढले होते. एकजण स्वतःहून बाहेर पडला होता व त्याला दुचाकीवरून इस्पितळात नेण्यात आले होते.


