‘एआय’च्या मदतीने ३९ वर्षीय विवाहिताचा बनाव; १४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

सिंधुदुर्गातील धक्कादायक प्रकार : इन्स्टाग्रामवर १७ वर्षांचा असल्याचे भासवून साधली जवळीक

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
55 mins ago
‘एआय’च्या मदतीने ३९ वर्षीय विवाहिताचा बनाव; १४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

कणकवली : एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःचे छायाचित्र बदलून इन्स्टाग्रामवर १७ वर्षीय तरुण असल्याची बनावट ओळख निर्माण करत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी ३९ वर्षीय विवाहित संशयित महेंद्र गणपत घाडीगांवकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने ‘मंथन’ नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले होते. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःच्या छायाचित्रात बदल करून तरुणासारखे रूप धारण केले होते. आपण १७ वर्षांचे असून महाविद्यालयात शिकत असल्याचे सांगून त्याने अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली. जानेवारी २०२६ मध्ये सुरू झालेल्या या संवादाचे पुढे मैत्रीत रूपांतर झाले. त्यानंतर त्याने मुलीचा विश्वास संपादन करून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
जंगल परिसरात भेटी
जुलैपासून कणकवली परिसरातील निर्जन जंगल भागात संशयित आणि मुलीच्या भेटी होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. हा प्रकार नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत सुरू होता. मुलीची मासिक पाळी चुकल्यानंतर पालकांना संशय आला. चौकशीत तिने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. कणकवली पोलीस पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्याच्या नावावर सिमकार्डचा वापर
तपासादरम्यान ‘मंथन’ या खात्याशी संबंधित मोबाईल क्रमांक दुसऱ्याच्या नावावर असल्याचे आढळले. चौकशीत हे सिमकार्ड संशयित वापरत असल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला त्याने गुन्ह्याशी संबंध नसल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने छायाचित्रावरून त्याला ओळखल्यानंतर पुढील चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा