आजपासून ‘इफ्फी’ला प्रारंभ

मुख्यमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा : चित्रपटसृष्टीतील दिग्गज लावणार उपस्थिती

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
19th November, 11:39 pm
आजपासून ‘इफ्फी’ला प्रारंभ

पणजी : दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला २० नोव्हेंबरपासून पणजीत सुरुवात होत आहे. चित्रपट प्रदर्शन, मास्टर क्लास, ओपन फोरम अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी महोत्सवात मिळणार आहे. महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी सायंकाळी होणार असला, तरी या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या कलाकारांची आणि सेलिब्रिटींची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. त्यांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

५७वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान पणजीत आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

२५ नोव्हेंबर रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार असून, रोमटामेळ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवानिमित्त कला अकादमी आणि आयनॉक्स परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी या रोषणाईमुळे पणजीच्या सौंदर्यात भर पडत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला आयनॉक्स तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने महोत्सवाला उपस्थित राहून चित्रपटांचा आनंद घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

२३० चित्रपटांचे होणार प्रदर्शन

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी इंडियन पॅनोरमा विभागाचे उद्घाटन होईल. आयनॉक्स, मॅकेनिझ पॅलेस, आयनॉक्स पर्वरी, झेड स्क्वेअर सम्राट, रवींद्र भवन-मडगाव आणि मॅजिक मूव्ही-फोंडा येथे चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. इंडियन पॅनोरमा, सिनेमा ऑफ द वर्ल्ड, वर्ल्ड प्रीमियर अशा विविध विभागांतून एकूण २३० चित्रपट दाखवले जाणार आहेत. गोव्यातील चित्रपटांसाठी स्वतंत्र विभाग ठेवण्यात आला असून, त्यासाठी १२ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. मिरामार, वागातोर हेलिपॅड आणि रवींद्र भवन-मडगाव येथे खुल्या जागेत स्क्रीनवर चित्रपट दाखवले जाणार आहेत.

हेही वाचा
सर्व पहा