डिचोली : डिचोली तालुक्यातील सरकारी अनुदानित हायस्कूलमधील एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. विद्यार्थिनीशी वैयक्तिक संपर्क साधून जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित शिक्षकावर करण्यात आला आहे.
या प्रकरणी गोवा पोलिसांनी (Goa Police) शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या व्यवस्थापनाकडून आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून सदर शिक्षक विद्यार्थीनीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता.
एका विद्यार्थी व विद्यार्थीनीकडूनही त्याने विद्यार्थीनीशी संदेश पाठवून बोलण्यास इच्छुक असल्याचे सांगितले होते. तसेच तिला मनगटी घड्याळही द्यायचे असल्याचे सांगितले होते. शिक्षकाच्या या प्रकारासंदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाला माहिती मिळताच त्याला समज देण्यात आली होती. वाटेला जाणार नाही असे लेखी लिहून घेतले होते. मात्र, शिक्षकाने विद्यार्थीनीचा पाठलाग करून जवळीक साधण्याचे प्रकार सुरूच ठेवले.
विद्यार्थीनीच्या पालकांनी यासंदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाशी तक्रार केली. त्यानंतर व्यवस्थापनाने संबंधित पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी बाल कायद्याच्या ८ कलमान्वये व पाठलाग केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. यासंदर्भात पुढील तपास गोवा पोलीस करीत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यात ४ वर्षांच्या २ बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या प्रकारामुळे संतापाची लाट पसरली आहे. त्यातच वरील प्रकार घडल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.


