कुंकळ्ळीत मुखवटाधारी व्यक्तींनी चाकूच्या धाकाने महिलेला लुटले

सोनसाखळी, बांगडी, अंगठी हिसकावली; महिला जखमी : कुंकळ्ळीतील भिवसा परिसरात मुखवटाधारी पुरुष आणि महिलेने एका घरात घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेचे सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या हल्ल्यात घरमालक जुडिथ डायस या जखमी झाल्या.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
कुंकळ्ळीत मुखवटाधारी व्यक्तींनी चाकूच्या धाकाने महिलेला लुटले

मडगाव : कुंकळ्ळीतील भिवसा परिसरात मुखवटाधारी पुरुष आणि महिलेने एका घरात घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेचे सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या हल्ल्यात घरमालक जुडिथ डायस या जखमी झाल्या. कुंकळ्ळी पोलीस (Cuncolim Police Station) याप्रकरणी तपास करत आहेत.

 मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  जुडीथ या राहत असलेल्या घराच्या बाजूलाच त्यांचे दीर व कुटुंबीय राहतात. मात्र गुरुवारी रात्री ते कुटुंबासह सायबिणीच्या दर्शनाला गेले होते व जुडीथ या घरात एकट्याच होत्या. जुडिथ डायस या घरी असताना दारावर कोणीतरी आले. त्यांनी ऑंटी म्हणून हाक मारली. दरवाजा उघडला असता दरवाजासमोर एक पुरुष व एक महिला चेहरा झाकून उभ्या होत्या.

त्यांनी डायस यांना चाकूचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, हातातील बांगडी आणि अंगठी जबरदस्तीने हिसकावून घेत दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटने वेळी डायस यांच्या नाकाला चाकू लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.

जुडीथ यांचे दीर व इतर कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. या घटनेची माहिती मिळताच कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संशयितांचा माग काढण्यासाठी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. माजी पोलीस अधीक्षक टोनी फर्नांडिस यांच्या निवासस्थानाजवळ ही घटना घडली. भरवस्तीत घडलेल्या या लूटमारीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कुंकळ्ळी पोलीस अज्ञात संशयितांचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.