गोवन वार्ता प्रतिनिधी
मडगाव
फातोर्डा पोलीस ठाण्यातील ड्युटीवरील दोन पोलीस कॉन्स्टेबलनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचे प्राण वाचले. कॉन्स्टेबल कल्पेश नागवेकर आणि अश्फाक कलबुर्गी यांनी प्रसंगावधान राखत संबंधित व्यक्तीला तातडीने सीपीआर देऊन पुढील उपचारांसाठी इस्पितळात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, फातोर्डा येथील पीपल्स पाथ परिसरात पोलीस कॉन्स्टेबल कल्पेश व अश्फाक कर्तव्यावर होते. यावेळी परिसरात थांबलेल्या गाडीकडून त्यांना मदतीचा आवाज आला. गाडीचालक एल्विस फर्नांडिस ही व्यक्ती अस्वस्थ होऊन कोसळल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागवेकर आणि कलबुर्गी यांनी तातडीने सीपीआर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर एल्विस यांना थोडे बरे वाटू लागल्यानंतर त्यांनी स्वच्छतागृहात जायचे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना थेट इस्पितळात जाण्यास सांगितले पण त्यांनी एका मिनिटात येतो असे सांगत ते गेले असता, त्याठिकाणी पुन्हा त्यांना त्रास होऊ लागला. त्यावेळी घटनास्थळी असलेल्या स्कॉर्पिओ गाडीतून एल्विस व त्याच्यासोबत असलेल्या लेस्ली मार्टिन्स यांना दक्षिण गोवा इस्पितळात पाठवण्यात आले.
पोलिसांच्या तत्परतेमुळे व तत्काळ सीपीआर देण्यात आल्याने एल्विस यांना ‘गोल्डन अवर’मध्ये मदत मिळाली. त्यांना उपचारांसाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे एल्विसच्या मित्राने पोलिसांना कळवले आहे. फातोर्डा पोलिसांच्या या समयसुचकतेमुळे एकाचा जीव वाचला याबाबत आमदार विजय सरदेसाई यांनीही पोलिसांचे कौतुक केले आहे.


