पणजी : आजच्या काळात चित्रपटसृष्टीसमोर ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा एआयची अशी आव्हाने आहेत. आपल्याला अधिक दर्जेदार आशय निर्माण करण्यावर भर द्यावा लागेल. अलीकडच्या काळात प्रेक्षक विविध प्रकारचे चित्रपट पाहत आहेत. मग त्यात मोठे कलाकार असोत किंवा नसोत, किंवा चित्रपटाचे बजेट कितीही असो. जर आशय चांगला असेल, तर प्रेक्षक नक्कीच तो चित्रपट पाहतील असे प्रतिपादन मधुर भांडारकर यांनी केले.
इफ्फीतील इंडियन पॅनोरमा (Indian Panoram of IFFI) विभागाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी इतर ज्युरी सदस्य उपस्थित होते. भांडारकर म्हणाले की, भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रात अनेक वर्षांपासून बदल होत आहेत. चित्रपटसृष्टीत सतत एक मोठी पुनरुज्जीवन प्रक्रिया सुरू आहे. चित्रपट निर्माते म्हणून आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे.
जेव्हा व्हिडिओ कॅसेटचा काळ आला होता, तेव्हा लोकांना वाटले होते की आता प्रेक्षक चित्रपटगृहात जाणार नाहीत. पण तरीही सिनेमा टिकून राहिला. त्यानंतर केबल टीव्ही आला, मग ओटीटी प्लॅटफॉर्म आले, पायरेसीचे संकट आले तरी या सर्व आव्हानांवर मात करून चित्रपट टिकून राहिला.
चित्रपट क्षेत्रातील या बदलांकडे लोक कशा प्रकारे पाहतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. काळानुसार गोष्टी बदलत असतात. तंत्रज्ञान बदलत आहे आणि ते कायम बदलत राहणार आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आपल्याला हे तंत्रज्ञान आत्मसात करावेच लागेल. जागतिक स्तरावर चित्रपटसृष्टी बदलली आहे आणि आपल्यालाही या प्रवाहासोबत पुढे जावे लागेल.
एक विद्यार्थी आणि चित्रपट निर्माता म्हणून मी दररोज काहीतरी नवीन शिकत असतो. सॉफ्टवेअर अपडेट' प्रमाणे तुम्ही स्वतःला अद्ययावत केले पाहिजे.
पॅनोरमा विभागातील चित्रपटांच्या निवडीबाबत भांडारकर म्हणाले की, ज्युरी पॅनल मधील सर्वांनी संपूर्ण भारतभरातील चित्रपटांचा विचार केला. आम्ही सर्वांनी मिळून सविस्तर चर्चा केली. यानंतर चित्रपटांची निवड करण्यात आली. आम्ही देशातील विविधता, कथेतील खरेपणा, कथेची अथवा दृश्यांची मांडणी, कथेतील भावनिकता अशा विविध मुद्द्यांवर चित्रपटांची निवड केली आहे. काही चित्रपटांचे बजेट खूप मोठे नव्हते. तरी त्यातील संकल्पना खूप प्रभावी होत्या. आम्हाला ते चित्रपट पाहून खूप आनंद झाला आणि ते भावनिकदृष्ट्याही खूप खोलवर स्पर्श करणारे होते.
पॅनोरमा विभागात प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्याची क्षमता असलेले मुख्य प्रवाहातील चित्रपट देखील निवडण्यात आले आहेत. या चित्रपटांची संकल्पना आणि कथानकाची कल्पना इतकी प्रभावी होती की, आम्ही सर्वांनी मिळून त्यांना निवडण्याचा निर्णय घेतला; असे भांडारकर यांनी सांगितले.


