पेडणे : मांद्रे येथे मालमत्तेच्या ताब्यावरून सुरू असलेला वाद आता पोलीस स्थानकापर्यंत पोहोचला आहे. बेल सिबो हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि तिचे संचालक व प्रतिनिधी यांच्याविरोधात मांद्रे येथील फेलिक्स ब्रिटो आणि कॅथरीन फेलिक्स ब्रिटो या दाम्पत्याने मांद्रे पोलीस स्थानकात (Mandrem Police Station) लेखी तक्रार दाखल केली आहे. तर एका गोमंतकीय जमीन मालकाला त्याच्याच मालमत्तेतून बेदखल करण्यासाठी पोलीस महासंचालकाकडून (डीजीपी) मांद्रे पोलीस निरीक्षकावर (पीआय) दबाव आणला जात असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते ॲड. अमित पालेकर यांनी केला आहे.
ब्रिटो दाम्पत्याच्या तक्रारीतून करारानुसार देय असलेली थकबाकी न भरणे, कराराच्या अटींचे उल्लंघन करणे, करार संपुष्टात आणल्यानंतरही मालमत्तेत बेकायदेशीर प्रवेश करण्याचा प्रयत्न करणे, अतिक्रमण, धमकावणे आणि फसवणूक केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी संबंधितांविरोधात तातडीने एफआयआर नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ब्रिटो दाम्पत्याने केली आहे.
तक्रारीनुसार, मांद्रे येथील सर्व्हे क्रमांक २२३/३ (पार्ट) मधील सुमारे २,१७३ चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन आणि त्यावरील बांधकाम ब्रिटो दाम्पत्याच्या मालकीचे आहे. या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबाही आपल्याकडे असल्याचे त्यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे.
२९ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आलेल्या सब-लीज करारानुसार, ही मालमत्ता बेल सिबो हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ठरावीक अटी व शर्तींवर व्यावसायिक वापरासाठी देण्यात आली होती. त्यानुसार कंपनीला तेथे रेस्टॉरंट आणि खोल्यांचा व्यवसाय चालविण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्याबदल्यात ठरलेली रक्कम नियमितपणे अदा करणे कंपनीवर बंधनकारक होते, असे तक्रारदारांनी म्हटले आहे.
थकबाकी न भरल्याने करार संपुष्टात आणल्याचा दावा
ब्रिटो दाम्पत्याच्या म्हणण्यानुसार, कंपनीने करारानुसार देय असलेली रक्कम वेळेत भरली नाही. थकबाकी भरण्यासाठी वारंवार विनंती करूनही कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे करारातील तरतुदींनुसार कंपनीला विविध नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही थकबाकी अदा न केल्याने अखेर करार संपुष्टात आणण्याची नोटीस देण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
करार संपुष्टात आल्यानंतर कंपनीला संबंधित मालमत्तेत प्रवेश करण्याचा किंवा त्यावर कोणताही अधिकार सांगण्याचा हक्क उरलेला नाही, असे दाम्पत्याचे म्हणणे आहे. मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा आजही आपल्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
डीजीपींचा मांद्रे पोलीस निरीक्षकावर दबाव : ॲड. पालेकर
एका गोमंतकीय जमीन मालकाला त्याच्याच मालमत्तेतून बेदखल करण्यासाठी पोलीस महासंचालकाकडून (डीजीपी) मांद्रे पोलीस निरीक्षकावर दबाव आणला जात आहे. दिल्लीस्थित एका रेस्टॉरंट मालकाचे हित जपण्यासाठी स्थानिक जमीन मालकावर अन्याय केला जात असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते ॲड. अमित पालेकर यांनी केला आहे.


