पणजी : जगभरातील चित्रपट निर्मात्यांनी गोव्यात चित्रीकरणास प्राधान्य द्यावे, यासाठी राज्य सरकारने चित्रपट निर्मिती सुलभ करण्यासाठी विविध पावले उचलली असून राज्यात अत्याधुनिक फिल्म सिटी बांधण्याचा प्रस्ताव आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सांगितले. श्यामाप्रसाद स्टेडियमवर आयोजित ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार रवी किशन, महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार उपस्थित होते.
गोव्यातील सिंगल विंडो धोरण आणि निसर्गसौंदर्य चित्रपट निर्मात्यांना नक्कीच आवडेल. चित्रपट क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अन्य नवीन तंत्रज्ञान येत असून, स्थानिकांनी या क्षेत्रातील संधींचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
गोव्यातील निसर्गसौंदर्य, पायाभूत सुविधा, पर्यटन, त्वरित परवाने, निर्मात्यांसाठीच्या योजना आणि सिंगल विंडो उपक्रमामुळे चित्रपट निर्मितीसाठी गोव्याची निवड केली जात आहे. ‘इफ्फी’ आणि ‘फिल्म बाजार’ यांसारखे उपक्रम यासाठी हातभार लावत आहेत. गेल्या २२ वर्षांपासून गोव्यात इफ्फीचे यशस्वी आयोजन होत असून, या भूमीत स्वप्ने जिवंत होतात आणि हा महोत्सव जागतिक सांस्कृतिक दिनदर्शिकेतील एक महत्त्वाचा भाग बनला आहे, असे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
हिंदी चित्रपटसृष्टीत गोमंतकीय कलाकारांचे मोठे योगदान आहे. यंदाच्या इफ्फीची संकल्पना ‘स्टोरीज विथआऊट बॉर्डर’ ही असून भारतीय तत्त्वज्ञानात यालाच ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हटले आहे. कथांची ताकद सर्वांना एकत्र आणत असून इफ्फीमुळे स्थानिक चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन मिळत आहे.
राज्य सरकारने कोकणी आणि मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी अनुदान योजना सुरू केली असून, बदलत्या काळानुसार यामध्ये सुधारणा केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- भोजपुरी चित्रपटांपासून ते इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यातील प्रमुख पाहुणेपदापर्यंतचा प्रवास सुखकारक आहे, अशा भावना खासदार रवी किशन यांनी व्यक्त केल्या.
- इफ्फी हा चित्रपटांचा महाकुंभ असून, आपल्या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात झाले होते, असे अभिनेता कार्तिक आर्यन यांनी सांगितले.
- कलाकारांना प्रेक्षकांसमोर नेण्यासाठी इफ्फी हा उत्तम मंच आहे, असे अभिनेत्री साई पल्लवी म्हणाल्या.
उद्घाटन सोहळ्यात तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मश्री रिकी केज यांनी आपली कला सादर केली. ‘म्युझिक विथआऊट बॉर्डर’ या कार्यक्रमात त्यांनी विविध देशांतील संगीतकारांना एकत्र घेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या थीम साँगचे एकत्रीकरण करून इफ्फीचे थीम साँग वाजवले. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


