श्री रुद्रेश्वर देवस्थान समिती यशवंत माडकर पॅनलकडेच

सातही पदांवर उमेदवारांना पसंती : एकूण १,१६८ महाजनांनी केले मतदान

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
just now
श्री रुद्रेश्वर देवस्थान समिती यशवंत माडकर पॅनलकडेच

साखळी : हरवळे-साखळी येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानच्या मुख्य व्यवस्थापन समिती व उपसमितीसाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी यशवंत माडकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर, उर्वरित सर्व सात पदांवरही माडकर यांच्या समर्थकांनी भरघोस मतांनी बाजी मारली आहे. एकूण १,७२८ पैकी १,१६८ महाजन मतदारांनी या प्रक्रियेत मतदान केले असून, विजयी उमेदवारांना ८०० हून अधिक मते मिळाल्याने पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
मुख्य व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी यशवंत माडकर यांची बिनविरोध निवड झाली. या समितीमध्ये खजिनदारपदी दीपक नाईक, मुखत्यारपदी सुभाष किनळकर तर सचिवपदी संगेश कुंडईकर विजयी झाले आहेत. पर्यायी समितीमध्ये अध्यक्षपदी दिलीप नाईक, खजिनदारपदी विघ्नेश शेट्ये, मुखत्यारपदी वासुदेव गावकर आणि सचिवपदी दामोदर नाईक यांची निवड करण्यात आली आहे.
हरवळे-साखळी येथील श्री रुद्रेश्वर मंदिर सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ वाजता नावनोंदणीनंतर ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच महाजन मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. दुपारपर्यंत हरवळेतील पांडवकालीन गुंफांपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर मतदान केंद्रावर महाजनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. या मतदानात भंडारी समाजातील अनेक राजकीय नेत्यांसह केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि आजी-माजी आमदारांनीही सहभाग घेतला. प्रशासन, पोलीस आणि देवस्थान समितीच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.
हरवळेतील श्री रुद्रेश्वर मंदिराची व्यवस्थापन समिती व उपसमिती स्थापित व्हावी, यासाठी आम्ही प्रतिक्षेत व संघर्षरत होतो. त्या संघर्षाला अखेर यश आले. या निवडणुकीत माझ्या समर्थक उमेदवारांना ८५० हून अधिक मते मिळाली असून, निवडणूक एकतर्फी झाली. सर्व महाजनांनी शांततेत मतदान केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
-यशवंत माडकर, नवनिर्वाचित अध्यक्ष

देव श्री रुद्रेश्वराच्या चरणी अनेक वर्षे सेवा केलेल्या माडकर समर्थक समितीतील महाजनांनाच मतदारांनी पसंती दिली आहे. हा विजय श्री रुद्रेश्वराचा असून, १,७२८ पैकी १,१६८ महाजनांनी मतदान करणे ही मोठी बाब आहे. कोणी राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असला, तरी देवस्थान महाजनांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.
-सुभाष किनळकर, नवनिर्वाचित मुखत्यार
 

हेही वाचा
सर्व पहा