पणजी : लैंगिक अत्याचाराच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान तक्रारदार महिलेने न्यायालयात तडजोडीचा अर्ज करून संशयिताच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध असल्यानेच त्याने लग्नास नकार दिला होता. तसेच आपल्याला गैरसमज झाल्यामुळे आपण तक्रार दाखल केली होती, अशी कबुली महिलेने न्यायालयात दिली. याची दखल घेऊन मेरशी येथील जलदगती न्यायालयाने तिसवाडी तालुक्यातील ३५ वर्षीय युवकाची निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश डाॅ. पूजा कवळेकर यांनी दिला.
पणजी महिला पोलीस स्थानकाने सदर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ११ जानेवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, एप्रिल २०२३ मध्ये तिची व संशयिताची पणजीत ओळख झाली होती. त्यानंतर जून २०२३ मध्ये संशयिताने तिला लग्नाची मागणी घातली. लग्नाचे आमिष दाखवून १ जून २०२३ ते ११ जानेवारी २०२४ या कालावधीत कांदोळी आणि ताळगाव परिसरात संशयिताने आपल्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला होता. याशिवाय संशयिताने वाळपई येथे घर बांधण्यासाठी भूखंड खरेदी करण्यासाठी तक्रारदार महिलेकडून ६ लाख ४८ हजार रुपये घेतले. त्यानंतर संशयिताने लग्नास नकार देत तिला हाकलून लावल्याचा आरोप केला. याची दखल घेऊन पणजी महिला पोलिसांनी संशयिताविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयिताला ६ मार्च २०२४ रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याच दिवशी त्याची सुटका करण्यात आली.
पणजी महिला पोलिसांनी तपास पूर्ण करून ७ मार्च २०२४ रोजी जलदगती न्यायालयात संशयिताविरोधात आरोपपत्र दाखल केले. यानंतर न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर महिलेच्या जबाबानंतर युवकाची निर्दोष सुटका करण्यात आली.
महिलेकडून तडजोडीचा अर्ज
न्यायालयात सुनावणी सुरू झाली असता, तक्रारदार महिलेने न्यायालयात तडजोडीचा अर्ज दाखल केला. त्यानुसार, न्यायालयाने सदर महिलेचा जबाब नोंद केला. त्यात तिने संशयिताच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध असल्यानेच त्याने लग्नास नकार दिला होता. तसेच आपल्याला गैरसमज झाल्यामुळे आपण तक्रार दाखल केली होती. अशी कबुली महिलेने न्यायालयात दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने तिसवाडी तालुक्यातील ३५ वर्षीय युवकाची निर्दोष सुटका केली.


