पत्नीच्या खूनप्रकरणी आल्फ्रेड परेराची निर्दोष मुक्तता

सबळ पुराव्याअभावी न्यायालयाचा निर्णय

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
20th November, 11:36 pm
पत्नीच्या खूनप्रकरणी आल्फ्रेड परेराची निर्दोष मुक्तता

मडगाव : २०२१ मध्ये काणकोण तालुक्यातील आगोंद येथे पत्नी सोनिया मोंतेरो ई परेरा हिची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या आरोपातून आल्फ्रेड परेरा याची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. खून आणि बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याच्या आरोपांखाली दाखल असलेल्या या खटल्याचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

१६ ऑक्टोबर २०२१ रोजी आगोंद परिसरात राहत्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ सोनिया मोंतेरो ई परेरा हिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गंभीर जखमी अवस्थेत तिला काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. या प्रकरणी काणकोण पोलिसांनी तपास करून पती आल्फ्रेड परेरा याला अटक केली होती.

पती-पत्नीमध्ये काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होते. कामावरून तसेच संशयाच्या कारणावरून त्यांच्यात मतभेद असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली होती. घटनेच्या काही दिवस आधी दोघांकडून परस्परविरोधी तक्रारीही दाखल करण्यात आल्याचे वृत्त होते. पोलिसांनी या प्रकरणात वापरलेले कथित बंदुकीसारखे शस्त्र जप्त करून न्यायवैद्यक तपासणी केली होती.

काणकोण पोलिसांनी आल्फ्रेड परेरा याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ आणि २५ अंतर्गत गुन्हा नोंदवून दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, न्यायालयात सादर केलेले पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद तपासल्यानंतर आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

निर्दोष मुक्ततेनंतर संशयिताला १० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याचे आदेश देण्यात आले. पूर्वीचा जामीनदार कायम ठेवण्याची संशयिताची विनंती न्यायालयाने मान्य केली असून, आवश्यक मुचलका सादर करण्यात आला आहे.

सोनिया मोंतेरो ई परेरा हिच्या नावे असलेल्या वाहनाची कागदपत्रे तसेच आरोपीची बँक कार्डे, ओळखपत्रे आणि अन्य कागदपत्रे त्याच्याकडे सुपूर्द करण्याबाबत १९ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेला अंतरिम आदेशही न्यायालयाने कायम ठेवला आहे.

जप्त बंदुकीची विल्हेवाट लावण्याचे न्यायालयाचे निर्देश

जप्त केलेली बंदूक योग्य विल्हेवाटीसाठी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांकडे जमा असलेली एव्हिएटर स्कूटर तिच्या नोंदणीकृत मालकाला परत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. इतर मुद्देमालातील कपडे, रेनकोट, बूट आणि तपासणीचे नमुने अपील कालावधी संपल्यानंतर नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा