पणजी : आसगाव येथील जमिनीचा मालक असल्याचे भासवून बनावट विक्री कराराद्वारे दिल्लीतील पंकज बजाज यांची ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने म्हापशाचा माजी नगरसेवक तारक आरोलकर याला १ लाख रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश न्या. आश्विन भोबे यांनी दिला.
या प्रकरणी दिल्ली येथील पंकज बजाज यांनी गुन्हा शाखेत तक्रार दाखल केली. त्यानुसार, तक्रारदाराला आरोलकर याने आसगाव येथील सर्व्हे क्रमांक ३७/४ मधील जमीन आपली असल्याचे भासवले. तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी जमिनीचा बनावट विक्री करारही दाखवण्यात आला. त्यानंतर जमीन खरेदीसाठी तक्रारदार बजाज यांनी आरोलकरच्या म्हापसा येथील आयसीआयसीआय बँक खात्यात ४० लाख रुपये जमा केले.
रक्कम स्वीकारल्यानंतर आरोलकर याने विक्री करार पूर्ण केला नाही तसेच पैसेही परत केले नाहीत. २ नोव्हेंबर २०२२ ते १७ ऑगस्टदरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारदाराने जमिनीबाबत अधिक चौकशी केली असता ती जोसेफ मारियान डिसोझा ऊर्फ जुझे एम. डिसोझा यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने बजाज यांनी गुन्हा शाखेकडे तक्रार दाखल केली.
गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमीन नाईक यांनी तपास सुरू केला. आरोलकर याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८ आणि ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर १९ आॅगस्ट रोजी तारक आरोलकरला अटक केली.
या प्रकरणी आरोलकरने सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. तो न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर त्याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने तारक आरोलकर याला १ लाख रुपये व इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.


