वैभववाडी : तालुक्यातील एका गावात अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वैभववाडी पोलिसांनी शिक्षक असलेल्या संशयित पित्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
वैभववाडी तालुक्यातील एका गावात परजिल्ह्यातील एक शिक्षक नोकरीस असून तो पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीसह संबंधित गावातील एका वाडीत वास्तव्यास आहे. शुक्रवारी (दि. २०) दुपारी एकच्या सुमारास पती-पत्नीत काही कारणावरून वाद झाला. या वादामुळे पत्नी रागाच्या भरात काही वेळासाठी घराबाहेर गेली. सुमारे अर्ध्या तासानंतर ती घरी परतली असता तिच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वतःच्या मुलीवर पतीकडून लैंगिक अत्याचार होत असल्याचे तिच्या निदर्शनास आले.
या प्रकाराने हादरलेल्या आईने सायंकाळी मुलीला सोबत घेऊन थेट वैभववाडी पोलीस ठाणे गाठले. पतीविरोधात तिने तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित पित्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शनिवारी संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.
दरम्यान, संशयित शिक्षकाचे यापूर्वी दोन विवाह झाल्याची माहिती समोर आली आहे. पहिला प्रेमविवाह काही दिवसांतच मोडला होता. त्यानंतर एका शिक्षिकेशी त्याचा दुसरा विवाह झाला. मात्र, वैवाहिक मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने तिसरा विवाह केला होता. तिसऱ्या पत्नीसोबतही त्याचे वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये जोरदार भांडण झाल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घरात दारूच्या अनेक रिकाम्या बाटल्या आढळल्याची माहिती समोर आली आहे. पोटच्या मुलीबाबत घडलेल्या या कथित प्रकारामुळे तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


