मडगावात आपच्या बैठकीत धक्काबुक्की, खुर्च्यांची तोडफोड

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
21st November, 11:25 pm
मडगावात आपच्या बैठकीत धक्काबुक्की, खुर्च्यांची तोडफोड

मडगाव : येथील मोतीडोंगर परिसरात आम आदमी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आप की चाय’ बैठकीत काही अज्ञातांनी गोंधळ घातला. या प्रकारावरुन आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी भाजपवर टीका केली असून काही व्यक्तींनी गोंधळ घालून कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

मोतीडोंगर येथील आम आदमी पक्षाच्या बैठकीवेळी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. खुर्च्या व टेबलांची तोडफोड करण्यात आली, तसेच बैठकीचे साहित्यही पळवून नेण्यात आल्याचा दावा नाईक यांनी केला. वाल्मिकी नाईक यांनी या प्रकारानंतर भाजप सरकारवर टीका केली. मडगावात आम आदमी पक्षाच्या कोपरा बैठकीला विरोध का केला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कार्यकर्त्यांना मारहाण आणि महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यामागील कारण काय, अशी विचारणाही त्यांनी केली. या घटनेचे व्हिडिओ पुरावे आपल्याकडे असून, हे प्रकरण शेवटपर्यंत नेणार असल्याचा इशारा नाईक यांनी दिला.

पोलिसांच्या प्रतिसादावर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधूनही सुमारे २० मिनिटे पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत. विशेष म्हणजे, पोलीस येण्याच्या नऊ मिनिटे आधीच हल्लेखोर तेथून निघून गेले होते. त्यामुळे हल्लेखोरांना कोणाचे पाठबळ होते, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

यापूर्वीही बैठकीसाठी निश्चित केलेल्या दोन ठिकाणांच्या मालकांना धमकावून बैठका रद्द करण्यास भाग पाडल्याचा दावा आपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी केला. मात्र, अशा प्रकारांना आपण घाबरणार नसून मोती डोंगरसह मडगाव मतदारसंघात यापुढेही बैठका घेणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा
सर्व पहा