पैंगीण : काणकोण मतदारसंघातील खोतिगाव ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या आवे जंक्शन ते पणसुलेमोळ या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, वारंवार विनंती करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनीच कंबर कसली आहे. स्थानिक रहिवाशांनी श्रमदानातून रस्त्यावरील मोठे खड्डे भरण्याचे काम स्वतः हाती घेतले आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोवा आदिवासी कल्याण विभागाने ऑगस्ट २०२६ च्या अखेरीस या रस्त्याच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध केली होती आणि सप्टेंबरमध्ये आर्थिक निविदा उघडण्यात येणार होत्या. मात्र, राजकीय कारणांमुळे अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. वारंवार निवेदने देऊन आणि वैयक्तिक भेटी घेऊनही काम मार्गी न लागल्याने संतप्त नागरिकांनी स्थानिक आमदारांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अखेर पणसुलेमोळ येथील रहिवाशांनी एकत्र येत आवे आणि पणसुलेमोळ जंक्शन या दोन ठिकाणी एकाच वेळी खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले. हे काम दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती या गटाचे नेते गौरेश वेळीप यांनी दिली. या श्रमदानात रुपेश वेळीप, सपनेश वेळीप, प्रेमानंद, कल्पेश, सुशांत, समर्थ, साजन, सचिन, गौरेश आणि श्रीकांत वेळीप यांच्यासह गावातील सुमारे २५ ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.
गव्यांच्या वावरामुळे अपघाताची भीती
खोतिगाव आणि अभयारण्याला लागून असलेल्या या परिसरात शेजारच्या वनक्षेत्रातून गवे वारंवार मानवी वस्त्यांकडे येत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नैसर्गिक अधिवास नष्ट होणे आणि अन्नाची कमतरता यामुळे हे वन्यप्राणी वस्तीकडे वळत आहेत. हे गवे पिकांचे नुकसान तर करतातच, शिवाय खराब रस्त्यामुळे रात्री-अपरात्री अचानक वाहनांसमोर येऊन भीषण अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.


