वास्को : ओमानमध्ये अडकलेल्या दिलेश तेली यांच्या सुखरूप मायदेशी परतीसाठी प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कृषीमंत्री संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) यांनी तेली यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. दिलेश यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे. लवकरच त्यांची मायदेशी परतण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या घटनेनंतर तेली यांच्या कुटुंबीयांनी आमोणकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आमोणकर यांनी अनिवासी भारतीय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला. सावईकर यांनी केंद्र सरकार आणि ओमानमधील भारतीय दूतावासाकडे या प्रकरणाचा पाठपुरावा केला.
यासंदर्भात सावईकर यांच्याकडून आपल्याला ई-मेल प्राप्त झाला असून, ओमानमधील भारतीय दूतावासाने दिलेश तेली यांच्या सुरक्षित मायदेशी परतीसाठी आवश्यक प्रवासाची कागदपत्रे तयार केली आहेत, अशी माहिती आमोणकर यांनी दिली.
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत त्यांच्या जहाजावर हल्ला झाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी दिलेश तेली यांच्यासह २२ खलाशांनी समुद्रात उड्या मारल्या होत्या. या सर्व खलाशांच्या सुरक्षित मायदेशी परतीसाठीही दूतावासाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून आपल्या मुलाच्या परतीची प्रतीक्षा करणाऱ्या तेली कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.


