केवळ शिक्षण किंवा इतर सुविधा पुरेशा नाहीत; धनगर समाजाला राजकीय प्रतिनिधित्वही मिळावे : मंत्री फळदेसाई

सांगेतील चिरेबांध येथे गजानृत्य सोहळ्यात सहभागी होत मंत्री सुभाष फळदेसाई यांनी धनगर समाजाला एसटी दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले, तर लोकपरंपरा जपण्याची जबाबदारी तरुण पिढीवर असल्याचेही अधोरेखित केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
केवळ शिक्षण किंवा इतर सुविधा पुरेशा नाहीत; धनगर समाजाला राजकीय प्रतिनिधित्वही मिळावे : मंत्री फळदेसाई

पणजी : सांगे तालुक्यातील चिरेबांध येथे धनगर समाजाच्या पारंपरिक गजानृत्य सोहळ्यात शेकडो धनगर बांधव आणि महिलांसह समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई उत्साहाने सहभागी झाले. ढोल-ताशांच्या गजरात रंगलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यात त्यांनी धनगर बांधवांशी संवाद साधत समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि दीर्घकाळ चालत आलेल्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. पारंपरिक उत्सवाच्या माध्यमातून समाजातील ऐक्य आणि उत्साह द्विगुणित होत असतानाच, समाजाच्या हक्कांच्या मुद्द्यावरही या निमित्ताने चर्चा झाली.




धनगर समाजाला एसटी दर्जा मिळावा : मंत्री फळदेसाई  

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून, या खूप उशीर झाला असला तरी त्यांना तो मिळवून देऊ असे मंत्री फळदेसाई यांनी स्पष्ट केले. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्यात राज्य सरकार, समाजकल्याण खाते आणि संबंधित विभाग समाजाच्या सोबत असल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वी अनेक वंचित घटकांना लाभ मिळाले; मात्र धनगर समाज वंचित राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सरकारने एसटी समाजासाठी शिष्यवृत्ती व इतर योजना लागू केल्या असल्या, तरी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये हक्काचे आरक्षण मिळण्यासाठी समाजाचा लढा सुरूच आहे.



केवळ घरबांधणी, शिक्षण किंवा इतर सुविधा पुरेशा नसून, धनगर समाजाला राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले. गोवा सरकार या दिशेने प्रयत्नशील असून, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (आरजीआय) यांच्याकडे मूल्यमापनासाठी आवश्यक बाबी, तज्ज्ञांचा अहवाल आणि व्हाईट पेपर सादर करण्यात आला आहे. असे असतानाही आरजीआयकडून वारंवार त्रुटी काढून प्रस्ताव मागे पाठवला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या विषयावर लक्ष देऊन पाठपुरावा करत असून, त्यातून लवकरच सकारात्मक मार्ग निघून तोडगा निघेल, असा विश्वास फळदेसाई यांनी व्यक्त केला.




लोककला आणि रितीरिवाज जपण्याची जबाबदारी तरुण पिढीवर!

धनगर समाज हा 'बळीराजा' असून, या समाजाची लोकनृत्य परंपरा आणि रितीरिवाज अत्यंत थोर आहेत. आजचे जग कितीही डिजिटल झाले किंवा वैज्ञानिक प्रगती झाली, तरी आपली संस्कृती, लोककला आणि परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा एक अमूल्य ठेवा आहे. ही समृद्ध परंपरा जपण्याची आणि संवर्धन करण्याची मोठी जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर येऊन पडली आहे असे मंत्री फळदेसाई म्हणाले.  



गजानृत्य हे केवळ एक नृत्य नसून, त्यामागे धनगर समाजाची गाढ धार्मिक भावना आणि श्रद्धा दडलेली असते. विठ्ठल-रुक्माईकडे एखाद्या कार्यासाठी केलेला नवस किंवा मागणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित घरामध्ये गजानृत्याचा हा पारंपरिक सोहळा आयोजित केला जातो. या सोहळ्याची पद्धत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि शिस्तबद्ध आहे. यासाठी समाजातील विशिष्ट आठ गावे एकत्र येतात आणि पानाचा विडा देऊन निमंत्रण दिले जाते. निमंत्रित पथक यजमानांना विठ्ठल-रखुमाईचे स्वरूप मानत देवाच्या सन्मानार्थ त्या घरामध्ये दाखल होते.




पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजत-गाजत निमंत्रितांचे उत्साहात स्वागत केले जाते. यानंतर विठ्ठल-रखुमाईचे स्वरूप असलेल्या किंवा घरात पूजलेल्या देवदेवतांच्या ठिकाणी  मागणे करून, देवाची भेट घेतली जाते आणि पारंपरिक गजा वेशभूषेत नृत्य सादर केले जाते.



गजानृत्याच्या निमित्ताने संपूर्ण धनगर समाज एकत्र येतो, ज्यामुळे समाजात एकोप्याची आणि ऐक्याची भावना निर्माण होते. जुने हेवेदावे किंवा वैर विसरून सर्वजण या उत्सवात जल्लोषात सामील होतात. धनगर बांधवांच्या या रितीरिवाजांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे आणि या पारंपरिक संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे, असे फळदेसाई म्हणाले.

हेही वाचा
सर्व पहा