मडगाव : बोर्डा येथील कुंडईकर वाईन स्टोअरसमोर दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात केतन अशोक कामत (38, रा. कालकोंडा, मडगाव) या युवकाचा मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघातात केतन यांचे वडील अशोक कामत हे किरकोळ जखमी झाले. (Boarda, Fatorda : Motorcycle accident youth dies)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुवे येथील सुजल नाईक (२१) हा अप्रिलिया दुचाकीने होली स्पिरीट चर्चकडून बोलशे सर्कलच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. बोर्डा येथील कुंडईकर वाईन स्टोअरसमोर पोहोचला असता, त्याने रस्ता ओलांडत असलेल्या केतन कामत यांच्या होंडा अॅक्टिव्हा दुचाकीला धडक दिली. त्यावेळी केतन यांचे वडील अशोक कामत हे दुचाकीवर मागे बसले होते.
या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळले. केतन कामत आणि सुजल नाईक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर अशोक कामत किरकोळ जखमी झाले. तिन्ही जखमींना 108 रुग्णवाहिकेतून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान केतन कामत यांचा मृत्यू झाला.
गंभीर जखमी सुजल नाईक याला पुढील उपचारांसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात हलवण्यात आले, तर अशोक कामत यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी (Fatorda Police भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१ आणि १०६ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुखदा प्रभुदेसाई पुढील तपास करत आहेत.


