गरिबीविरुद्धच्या लढ्याला कलाटणी देणारे दशक

१४० कोटी भारतीयांनी केलेल्या संकल्पाच्या बळावर २०४७ पर्यंत विकसित भारताची जडणघडण करण्याचे हे ध्येय आपल्या आवाक्यात आहे आणि आपण सर्वजण मिळून ते साध्य करू.

Story: विचारचक्र |
22nd November, 11:41 pm
गरिबीविरुद्धच्या लढ्याला कलाटणी देणारे दशक

साधारण वर्षभरापूर्वी मी नागालँडमधील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या किफिरे या आकांक्षीत जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात मी स्थानिक बचत गटांतील आदिवासी महिलांशी संवाद साधला. त्यांच्यामध्येच एस्थर नावाची एक लखपती दीदी होती. आपली भरड धान्यांवर आधारित उत्पादने नागालँडच्या सीमा ओलांडून कितीतरी पलीकडच्या भागांपर्यंत ऑनलाइन माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याची गोष्ट तिने मोठ्या अभिमानाने सांगितली होती. या संवादात त्या सगळ्यांनी व्यक्त केलेला उज्ज्वल भविष्याबद्दलचा आत्मविश्वास माझ्या मनात घर करून राहिला. मी सुद्धा त्यांना अधिक मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि करोडपती दीदी बनण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. खरे तर त्यांच्या या यशोगाथांमधून भारताच्या अगदी दुर्गम कोपऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या परिवर्तनाचीच प्रचिती येत होती. महत्वाचे म्हणजे कधीकाळी भौगोलिक आणि आर्थिक आव्हानांमुळे दीर्घकाळापासून या भागांपर्यंत पोहोचणाऱ्या संधी मर्यादितच राहिल्या होत्या. मात्र आता अशाच परिस्थितीतही उद्याच्या चांगल्या भविष्याची आकांक्षा विस्तारू लागल्या आहेत, हेच वास्तव आहे.

गेल्याच महिन्यात जागतिक बँकेने दारिद्र्य आणि समतेबाबतचा भारतावरील आपला अहवाल प्रसिद्ध केला. हा अहवाल पाहून मला किफिरेमधील त्या संवादाची आठवण झाली. २०११ ते २०२३ या कालावधीत सुमारे ५० कोटी भारतीय दारिद्र्याच्या परिस्थितीतून बाहेर पडले असून, अत्यंत टोकाच्या दारिद्र्याची स्थिती जवळपास संपुष्टात आली असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. एका अर्थाने मी प्रत्यक्ष अनुभवलेल्या परिवर्तनाचेच चित्र या आकडेवारीने टिपले होते असे निश्चितच म्हणता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने तात्पुरत्या मदतीपासून ते कायम दारिद्र्यात जगायला लावणारे अडथळे दूर करण्यापर्यंतचा एक मूलभूत बदल अनुभवला आहे. गरिबी म्हणजे केवळ उत्पन्न किंवा मजुरीची कमतरता असा अर्थ नाहीच. सुरक्षित छत, स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह किंवा आरोग्य सेवा नसलेले कुटुंब उत्पन्न वाढल्यानंतरही असुरक्षितच असते हे आपण समजून घ्यायला हवे. एका आजारपणामुळे सर्व बचत संपू शकते आणि कुटुंबाला पुन्हा दारिद्र्याचा गर्तेत लोटले जाऊ शकते. म्हणूनच, केंद्र सरकारने खऱ्या गरजूंना लक्ष्य करून, मूल्यमापन करता येण्याजोग्या फलनिष्पत्तीवर भर देऊन आणि जी वंचितता दूर करायची आहे तिचे स्वरूप लक्षात घेऊनच प्रत्येक योजना तयार केली आहे. यामागे कोणतीही जादूची कांडी नव्हती. प्रत्येक योजनेसाठी लाभार्थ्यांची अगदी काळजीपूर्वक निश्चिती करणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि शेवटच्या कुटुंबापर्यंत लाभ पोहोचेपर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा गरजेचाच होता. त्यामुळेच तर पंतप्रधान मोदी यांनी स्वतः अंमलबजावणीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले, अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या टप्प्यांवर गरजेचा हस्तक्षेप केला, पाठपुरावा होत राहील याची सुनिश्चिती केली आणि लाभाचे योग्य तऱ्हेने वितरण होत आहे की नाही हे तपासण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याला प्रोत्साहन दिले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी शौचालयांची सुविधा उपलब्ध दिल्यामुळे स्वच्छता विषयक परिस्थितीत सुधारणा घडून आली आणि दरवर्षी अंदाजे ६० हजार ते ७० हजार शिशुमृत्यू टाळण्यास मदत झाली आहे. जल जीवन अभियानामुळे ग्रामीण भागातील नळजोडणीची व्याप्ती २०१९ मधील सुमारे ३ कोटी कुटुंबांवरून जवळपास १६ कोटी कुटुंबांपर्यंत विस्तारली आहे.

उज्ज्वला योजनेमुळे स्वयंपाकघरे स्वच्छ आणि धूरमुक्त झाली आहेत, त्याचवेळी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पक्क्या घरांमुळे सुरक्षा आणि सन्मानही लाभला आहे. रुग्णालयात रोखरहित उपचार देणाऱ्या आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून, वैद्यकीय खर्चाच्या बाबतीत भक्कम आर्थिक संरक्षण लाभले आहे. एकूणात या सर्व योजना मिळून कुटुंबाला पुन्हा पुन्हा दारिद्र्यात ढकलणाऱ्या संकटांविरुद्धचे विमा कवच म्हणून उपयुक्त ठरल्या आहेत. ५९ कोटींहून अधिक  जनधन खात्यांमुळे, आता कोणत्याही मध्यस्थाची गरज भासत नाही, आणि त्यामुळेच प्रत्येक लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू लागला आहे. बँक खात्यामुळे आपली बचत सुरक्षितपणे ठेवण्याची सोय उपलब्ध होते आणि त्याला समांतरपणेच आर्थिक व्यवहाराच्या नोंदी तयार होतात आणि त्यातून औपचारिक कर्ज मिळण्याचे दरवाजेही उघडू लागतात. मुद्रा योजनेअंतर्गत आजमितीला ६० कोटी कर्ज खात्यांना मंजुरी दिली गेली आहे. यांपैकी सुमारे दोन तृतीयांश खाती ही महिलांची आहेत, तर प्रधानमंत्री स्वनिधी आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा यांसारख्या योजना पथविक्रेते आणि पारंपरिक कारागिरांना पाठबळ देणाऱ्या ठरल्या आहेत.

महत्वाचे म्हणजे या परिवर्तनाचे नेतृत्व महिलांनी केले आहे. आजमितीला ग्रामीण भागात राहणाऱ्या १० कोटी महिला बचत गटांशी जोडल्या गेलेल्या आहेत. दीनदयाल अंत्योदय योजने अंतर्गत राबवले जात असलेले राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान आणि इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून हे गट आता बचत, कौशल्य, कर्ज आणि उद्योजकतेचे व्यासपीठ बनले आहेत. या गटांच्या माध्यमातून ३.७ कोटींहून अधिक महिला लखपती दीदी बनल्या आहेत. त्यांच्यामधीलच काही महिला पुढे जाऊन करोडपती दीदी बनू लागल्या आहेत. नमो ड्रोन दीदी म्हणून प्रशिक्षित झालेल्या इतर महिला आता शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीच्या सेवा पुरवत आहेत.

अर्थात इतके यश मिळाले असले तरी, इथेच थांबण्याची ही वेळ नाहीच. २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या वाटचालीतही काही आव्हाने आहेतच. त्यामुळेच आता या पुढच्या टप्प्यात आपल्याला या प्रगतीचा आधार घेत, अजूनही अवघ्या काही प्रमाणातील पण तरीही सर्वात खालच्या स्तरावर असलेल्या लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढले जाईल आणि जे आधीच दारिद्र्याबाहेर आले आहेत ते पुढे जात राहतील, त्यांची पुन्हा मागे घसरण होणार नाही याची सुनिश्चिती करायची आहे. विविध उपाययोजनांच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या संरक्षणाला आता वित्त, बाजारपेठ आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या अधिक व्यापक उपलब्धतेची जोड देणे गरजेचे असणार आहे. याच अनुषंगाने केंद्र सरकार रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना, इंटर्नशिप आणि शिकाऊ उमेदवारी अशा उपाययोजनांच्या माध्यमातून शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रात  अधिक घनिष्ठ दुवे प्रस्थापित करण्याचे काम करत आहे. त्याचवेळी पायाभूत सुविधांमध्ये केल्या जात असलेल्या गुंतवणुकीतून देशात अभूतपूर्व संपर्क जोडणी निर्माण होऊ लागली आहे. प्रत्येक भारतीयाने स्वातंत्र्याप्रमाणेच विकसित भारताचा हा संकल्पही जगायला हवा असा संदेश पंतप्रधानांनी दिला आहे. या आधीच्या सहा दशकांत जी आश्वासने पूर्ण केली गेली नव्हती, ती सरकारने गेल्या दहा वर्षांच्या काळातच पूर्णत्वाला नेली आहेत. त्यामुळे आता आपला भारत पुढच्या वीस वर्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो. १४० कोटी भारतीयांनी केलेल्या संकल्पाच्या बळावर २०४७ पर्यंत विकसित भारताची जडणघडण करण्याचे हे ध्येय आपल्या आवाक्यात आहे आणि आपण सर्वजण मिळून ते साध्य करू.