संवेदनशील घटनांचे वृत्तांकन आणि माध्यमांची जबाबदारी

Story: अंतरंग - गोवा |
22nd November, 11:39 pm
संवेदनशील घटनांचे वृत्तांकन आणि माध्यमांची जबाबदारी

राज्यात मागील १५ दिवसांत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. म्हापसा, काणकोण, बांबोळी आणि कळंगुट या परिसरात चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दिवाळीच्या रात्री म्हापसा येथील लोहिया मैदानाजवळच्या एका निर्जन इमारतीत एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली होती. या घटनेनंतर दोन दिवसांत दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यात एका चार वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. याच दरम्यान, बांबोळी परिसरातील एका माध्यमिक विद्यालयातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलाकडून प्राथमिक शाळेतील ८ वर्षांच्या मुलावर लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर कळंगुट परिसरात एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलाने ५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

म्हापसा आणि काणकोण या दोन्ही प्रकरणांत गोवा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांच्या मदतीने संशयित आरोपींना अटक केली, तर बांबोळी आणि कळंगुट प्रकरणात संशयित अल्पवयीन असल्यामुळे, या संदर्भात पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे (जुवेनाइल जस्टिस बोर्ड) पुढील प्रक्रिया करण्यासाठी अहवाल सादर केला. या घटनांची गंभीर दखल घेत गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (जीएससीपीसीआर) बाल संरक्षण समित्या अधिक सक्रिय करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, म्हापसा, काणकोण आणि कळंगुट प्रकरणातील पीडित मुलांची काही प्रमाणात ओळख प्रसारमाध्यमांनी उघड केली आहे. अशा संवेदनशील घटनांची बातमी देताना प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याशिवाय आधुनिक दुनियेत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी दिलेली माहिती फेसबुक, व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आगीप्रमाणे पसरते. गोवा बाल कायदा, बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा (पॉक्सो) आणि पत्रकारितेच्या नैतिक नियमानुसार, पीडित बालकाची ओळख कोणत्याही परिस्थितीत उघड होऊ नये याची काळजी घेणे बंधनकारक आहे. पीडितेचे नाव, पत्ता, शाळा, कुटुंबीयांची माहिती किंवा ओळख पटू शकेल असा कोणताही तपशील प्रसिद्ध करणे कायद्याने गुन्हा आहे.

अशी बातमी देताना सनसनाटी निर्माण करणे किंवा घटनेचे अनावश्यक आणि भीषण वर्णन करणे टाळले पाहिजे. यामुळे पीडित बालकाला आणि त्याच्या कुटुंबाला सामाजिक कलंक व मानसिक आघाताचा सामना करावा लागतो. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बातम्या टाळाव्यात. तपासादरम्यान अफवा किंवा चुकीची माहिती पसरवणेही टाळावे. त्याऐवजी प्रसारमाध्यमांनी घटनेचे गांभीर्य, पोलीस तपासातील प्रगती, प्रशासनाची जबाबदारी आणि सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तसेच, बालकांच्या सुरक्षेसाठी असलेले कायदे, मुलांना 'चांगला आणि वाईट स्पर्श' याबाबत शिक्षित करणे आणि संकटाच्या वेळी १०९८ (चाइल्डलाइन) किंवा ११२ अशा आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकांची माहिती देऊन जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.