ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभास हवेत हळूहळू गारवा वाढू लागतो. या काळात गोव्यासह कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीचे मादी समुद्री कासव अंडी घालण्यासाठी येतात. हा विणीचा हंगाम मार्च महिन्यापर्यंत आणि काही वेळा एप्रिल ते मे पर्यंतही सुरू राहतो. कासवांनी अंडी घातल्यानंतर दोन महिन्यांनी अंड्यांतून पिल्ले बाहेर येऊ लागतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर या पिल्लांना लगेचच समुद्रात जाऊ देणे हितावह असते. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७९ (सुधारित १९९१) अंतर्गत लाल यादीत ही प्रजाती असुरक्षित असल्याचे सूचीबद्ध केले आहे. त्यामुळे उत्तर गोव्यातील मोरजी, मांद्रे, तर दक्षिण गोव्यातील आगोंद, गालजीबाग किनाऱ्यांवर समुद्री कासवांना संरक्षण देण्यात आले आहे. हे संरक्षण देताना मानवी हस्तक्षेप होऊ नये किंवा तो मर्यादित राहावा, यासाठी अनेक निर्बंध घातले गेले आहेत. त्यामुळे या चारही किनाऱ्यांवर सप्टेंबर ते मार्च-एप्रिल दरम्यान विविध व्यवसाय करणारे स्थानिक काहीसे नाराज असतात. कासवांसाठी माणसांच्या पोटावर पाय का देता, असा सवालही ते करतात. त्यातूनच निर्बंधांचे उल्लंघनही करण्याचा प्रकार घडतो. अशा स्थितीत राज्य सरकारच्या वन खात्याने वरील चार किनाऱ्यांसह आणखी २० किनारे कासव संवर्धन क्षेत्र म्हणून अधिसूचित करावे, यासाठी गोवा सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल खात्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. वन खात्याच्या सहाय्यक वनसंरक्षकांनी पत्राद्वारे एकूण २४ समुद्रकिनाऱ्यांचा समावेश किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) अधिसूचना २०१९ अंतर्गत कासवांच्या घरटी क्षेत्रांमध्ये करण्याची विनंती केली आहे. या प्रस्तावावरून गोव्याच्या किनारपट्टी भागातील व्यावसायिकांनी विरोधाचा सूर आळवण्यास प्रारंभ केला आहे.
शॅक हा किनारपट्टीवरील प्रमुख व्यवसाय. वॉटरस्पोर्ट्सचे विविध प्रकार व इतर व्यवसायांच्या माध्यमातून किनारपट्टीवर हजारो लोकांची उपजीविका चालते. पर्यटन उद्योगाला पूरक असलेल्या या व्यवसायांना कासव संरक्षित क्षेत्रामुळे मर्यादा येऊ शकतात. किंबहुना पर्यटन उद्योगावर त्याचा परिणाम होऊ शकतो. सध्या ज्या चार किनाऱ्यांवर कासव प्रजननासाठी घातलेले निर्बंध पाहता, आणखी २० किनारे या प्रक्रियेत समाविष्ट केले, तर कासव विरुद्ध मानव असा नवा संघर्ष उभा राहू शकतो. निर्बंधांनुसार, समुद्राच्या भरती-ओहोटीच्या क्षेत्रात डेक बेड ठेवता येत नाहीत. शॅकच्या बाहेरील बाजूस प्रखर प्रकाशाचे दिवे लावण्यास मनाई आहे. शॅकमधील प्रकाश मंद ठेवणे, समुद्राकडील बाजूस अपारदर्शक आच्छादन असणे, सायंकाळी ६ वाजल्यानंतर मोठ्या आवाजात संगीत न वाजवणे, सायंकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत शॅकचे कामकाज, कृत्रिम रोषणाई, मोठ्या आवाजातील संगीत आणि फटाके यांना मनाई या भागात आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रत्येक उल्लंघनासाठी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई आकारण्याची तरतूद आहे. वारंवार उल्लंघन झाल्यास शॅकचा परवाना रद्द करून बांधकाम हटविण्याची कारवाईसुद्धा होऊ शकते. अशा स्थितीत उत्तर गोव्यातील मोरजी, मांद्रेसह वागातोर, कळंगुट, कांदोळी, केरी, मिरामार, आश्वे, बागा, हरमल आणि दक्षिण गोव्यातील आगोंद, गालजीबागसह राजबाग, मोबोर, काब दि राम, पाटणे, बायणा, पाळोळे, खोला, कार्मोणा, केळशी, वार्का, तळपण या किनाऱ्यांवर निर्बंध आणल्यास व्यावसायिकांची आणि पर्यायाने पर्यटन उद्योगाची परिस्थिती बिकट होऊ शकते. विशेषत: पारंपरिक रापणकारांनाही त्याची झळ पोहचू शकते.
व्यावसायिकांच्या रोजीरोटीइतकाच ऑलिव्ह रिडलेच्या संवर्धनाचा मुद्दाही तितकाच संवेदनशील आहे. हे कासव जेलीफिश, खेकडे व इतर दुय्यम सागरी जीव भक्षण करून अन्नसाखळीचा समतोल राखण्यास मदत करतात. कासवांच्या किनाऱ्यांवरील घरट्यांमधील न उबलेली अंडी आणि उरलेले कवच यातील पोषकद्रव्ये वाळूत मिसळतात. किनारी परिसंस्थेला त्या उपयुक्त असतात. मुख्य मुद्दा म्हणजे, कासवांची मोसमातील एकूण संख्या, प्रजनन प्रक्रिया आणि घरट्यांचा अभ्यास करून पर्यावरणातील बदलांचा अंदाज घेता येतो. नैसर्गिक समतोलाच्या दृष्टीने हा समुद्री जीव माणसाइतकाच महत्त्वपूर्ण आहे. आजच्या एकूणच पर्यावरणीय तोलाचा ढासळणारा डोलारा पाहता, ऑलिव्ह रिडले कासवांचे जास्तीत जास्त संवर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी सध्याच्या चार किनाऱ्यांसह आणखी काही किनारे अधिसूचित करणे रास्तच आहे. मात्र हे करत असताना निर्बंधांचे जाळे काही प्रमाणात शिथिल करणे आवश्यक आहे. कासवांचा विणीचा हंगाम आणि पर्यटन हंगाम जवळपास एकाच काळात येत असल्याने यात कसा ताळमेळ साधता येईल, यावर पर्यावरण तज्ज्ञ आणि सरकारने मिळून तोडगा काढावा लागेल. मानव आणि कासव यांच्यातील अस्तित्वाचा संघर्ष या दोघांपैकी कोणाच्याच मुळावर येता नये. त्यासाठी कासवांच्या अधिवासाचा भाग निश्चित करून रापणकार आणि पर्यटनक्षेत्रातील व्यावसायिकांनाही व्यवसायाच्या संधी मिळायला हव्यात. तरच कासव की माणूस, असा प्रश्न निर्माण होणार नाही.


