माणूस आजारी पडतो तेव्हा त्याला औषधोपचारांची गरज असतेच; पण त्याचबरोबर मानसिक आधार, आपुलकी आणि आपल्या माणसांच्या सहवासाचीही आवश्यकता असते. विशेषतः घरापासून दूर असलेल्या रुग्णाला आणि त्याच्या नातलगांना रुग्णालयात उपचार घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रुग्णालयात उपचारांची सोय असते; परंतु रुग्णाच्या नातलगांनी राहायचे कुठे, जेवायचे कुठे आणि आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर या सगळ्याचा खर्च कसा भागवायचा, असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात. याच मानवी गरजेतून गोव्यात विश्व हिंदू परिषदेच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या मातृछाया संस्थेच्या माध्यमातून 'रुग्णाश्रय' ही संकल्पना साकारली. आज या संकल्पनेने केवळ निवासाची सुविधा एवढीच मर्यादा ओलांडून रुग्णसेवा, पुनर्वसन, कृत्रिम अवयव, प्रशिक्षित रुग्णसहाय्यक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र अशा अनेक क्षेत्रांत आपला विस्तार केला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या मातृछाया संस्थेतर्फे संचालित रुग्णाश्रयात विद्यमान अध्यक्ष चित्रा नाईक व निवासी संचालक भरत दामले आपल्या निस्वार्थी सहकाऱ्यांसह कार्यरत आहेत. नव्याने येणाऱ्या रुग्णांना कोणत्याही इस्पितळात सोपस्कार करून उपचार घेईपर्यंत सोबत देण्यासाठी एक सेवाभावी पथक मातृछायेतर्फे तयार करण्यात आले आहे, जे राज्यातील सर्व सरकारी इस्पितळांमध्ये विनामूल्य सेवा देत आहे. रुग्ण रुग्णालयात दाखल झाला की त्याच्या नातलगांना राहण्यासाठी कोणतीही पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसते. विशेषतः गोव्याबाहेरून आलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांची मोठी गैरसोय होत असे. या अडचणीतूनच रुग्णाश्रयची संकल्पना पुढे आली. सुरुवातीला कालापूर येथे भाड्याच्या एका सदनिकेत हा उपक्रम सुरू झाला. रुग्ण आणि त्याच्या नातलगांच्या राहण्याची सोय करणे एवढेच त्याचे स्वरूप होते. मात्र, या सुविधेची माहिती पसरत गेली तशी मागणी वाढली. उपलब्ध जागा अपुरी पडू लागली. अखेर २००७ मध्ये बांबोळी येथील जीएमसी रुग्णालयापासून चालत जाण्याच्या अंतरावर रुग्णाश्रयची स्वतंत्र वास्तू उभी राहिली. आज ती केवळ निवासस्थान राहिलेली नाही, तर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना विविध प्रकारचा आधार देणारे एक व्यापक सेवा केंद्र बनले आहे.
जीएमसीत उपचार घेऊन बऱ्या झालेल्या अनेक रुग्णांना घरी परतण्यासाठी रुग्णाश्रयने अत्यंत माफक दरात रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.
रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन फिजिओथेरपी विभागही सुरू करण्यात आला. अवघ्या ३०० रुपयांच्या नाममात्र शुल्कात तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टचा सल्ला आणि उपचार मिळण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. रुग्णाश्रयच्या कार्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मणक्याला दुखापत झालेल्या रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेले पुनर्वसन केंद्र. गोवा सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या सहकार्याने सुमारे दोन वर्षांपूर्वी हे केंद्र सुरू झाले. या उपक्रमासाठी एक महिला आणि एक पुरुष फिजिओथेरपिस्ट यांनी दिल्ली येथे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या मदतीला दोन सहाय्यकही आहेत. मणक्याला गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीला पुन्हा स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी अनेक महिने उपचार आणि नियमित व्यायाम करावा लागतो. अशा परिस्थितीत रोज घरून जीएमसीत ये-जा करणे म्हणजे वेळ, श्रम आणि पैशांचा मोठा प्रश्न असतो. ही अडचण लक्षात घेऊन रुग्णाश्रयमध्येच निवासी पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. रुग्ण आणि त्याच्या नातलगांच्या राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था नाममात्र शुल्कात केली जाते. त्यामुळे उपचारांसाठी रोजचा प्रवास करण्याची गरज उरत नाही. कृत्रिम अवयवांची गरज असलेल्यांसाठी रुग्णाश्रयने जयपूर फूट केंद्र सुरू केले असून, त्यासाठी कोल्हापूरहून तज्ज्ञ व्यक्ती येतात. वर्षातून दोन वेळा विशेष शिबिरांचे आयोजन केले जाते. रोटरी क्लब म्हापसा आणि रुग्णाश्रय यांच्या सहकार्याने या उपक्रमाचा संपूर्ण आर्थिक भार उचलला जातो. त्यामुळे गरजू रुग्णांना जयपूर फूटची सुविधा पूर्णपणे विनामूल्य मिळते.
रुग्णाश्रयच्या कार्यातील सर्वाधिक सामाजिक परिणाम घडविणारा उपक्रम म्हणजे 'सहायता होम नर्सिंग' हा प्रशिक्षण अभ्यासक्रम. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना, ज्येष्ठ नागरिकांना किंवा दैनंदिन कामांसाठी दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्यांना प्रशिक्षित मदतनीसांची आवश्यकता असते. यासाठी रुग्णाश्रयमध्ये सहा महिन्यांचा निवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. वर्षातून दोन वेळा प्रत्येकी २० विद्यार्थिनींच्या दोन तुकड्या प्रशिक्षित केल्या जातात. आतापर्यंत २१ तुकड्या प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्या आहेत. प्रवेशासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आणि किमान आठवी उत्तीर्ण असणे एवढेच निकष आहेत. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. त्यांच्या निवासाची आणि भोजनाची संपूर्ण व्यवस्था मातृछाया संस्थेतर्फे केली जाते. अभ्यासक्रमाचे पहिले तीन महिने पुस्तकी शिक्षण दिले जाते, तर पुढील तीन महिने जीएमसीच्या विविध वॉर्डमध्ये प्रत्यक्ष कामाचा सराव करून घेतला जातो. रुग्णाश्रयतर्फे प्रशिक्षित केलेल्या सुमारे ३० होम नर्सेस सध्या विविध घरांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याकडून रुग्णाश्रय कोणत्याही प्रकारची दलाली किंवा कमिशन घेत नाही. या प्रशिक्षित मुलींना कामानुसार साधारण १५ ते २० हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळू शकते.
रुग्णाश्रयच्या अन्य उपक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राची भर पडली आहे. वाढत्या वयात अनेक ज्येष्ठ नागरिक एकटेपणा अनुभवतात. घरात असूनही त्यांना संवादासाठी आणि मन रमविण्यासाठी पुरेशी संधी मिळत नाही. या केंद्रात वाचनालयाची सुविधा आहे. त्याचबरोबर बैठे खेळ खेळण्याचीही व्यवस्था आहे. दर मंगळवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त विषयांवर व्याख्यान, चर्चासत्र किंवा मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कायदेविषयक माहिती, योग, ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य अशा विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने झाली आहेत. मातृछाया या संस्थेने ५० व्या वर्षांत प्रवेश केल्यावर राज्यात किमान ५० संस्कार वर्ग सुरू करण्याचे पदाधिकाऱ्यांनी ठरवले, त्यापैकी दोन वर्ग रुग्णाश्रय चालवते. रुग्णाश्रयाच्या जागेत साप्ताहिक वर्ग शनिवारी एक तासाचा असतो, तर ताळगाव येथील तुळशीमाता मंदिरात एक वर्ग घेतला जातो. दररोज संध्याकाळी महिलांचा योगासन वर्ग रुग्णाश्रयात चालतो. आठवड्यातून तीन वेळा मुलामुलींसाठी कराटे वर्ग घेतले जातात. शेवटी, रुग्णाश्रयची खरी ओळख त्याच्या वास्तूत नाही, तर त्या वास्तूतून मिळणाऱ्या माणुसकीच्या आधारात आहे. कारण रुग्णसेवा म्हणजे केवळ आजारावर उपचार नव्हे; तर संकटात सापडलेल्या माणसाला पुन्हा उभे राहण्यासाठी हात देणे, हेच तिचे खरे स्वरूप आहे.



