श्वासाची रहस्ये

तुमच्या श्वसनयंत्रणेचा अर्धा भाग तिथे बाहेर झाडावर लटकलेला आहे. भौतिक शरीर हा त्याचा केवळ एक भाग आहे. दुसरा भाग सर्वत्र घडत आहे. म्हणून श्वास हा केवळ तुमच्यापुरता मर्यादित नाही; त्याला वैश्विक संदर्भ आहे.

Story: विचारचक्र |
15th November, 07:55 pm
श्वासाची रहस्ये

सद्गुरू : सर्वसाधारणपणे इंग्रजीतील ‘breath’ (ब्रेथ) या शब्दाला नेमका जुळणारा शब्द भारतीय भाषांमध्ये नाही. त्याचा उल्लेख नेहमी प्राणश्वास असाच केला जातो. योगशास्त्रात श्वासाचे अनेक आयाम आहेत. श्वासाला ‘कूर्म नाडी’ म्हटले जाते. हाच तो धागा आहे, जो तुम्हाला शरीराशी बांधून ठेवतो. मी तुमचा श्वास काढून घेतला, तर तुम्ही आणि तुमचे शरीर वेगळे होऊन जाल. कूर्म नाडी म्हणजे केवळ हवेचा मार्ग नव्हे. लोकांना आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला सांगितले, तर बहुतेक जण श्वासाचा अनुभव घेत नसतात; त्यांना केवळ हवेच्या हालचालीमुळे होणाऱ्या संवेदनांचाच अनुभव येतो. कूर्म नाडी म्हणजे या संवेदना किंवा छाती अथवा श्वासपटलाची हालचाल नव्हे. ती म्हणजे स्वतः श्वासच.

श्वासातून प्रवास कसा करायचा, केवळ हवेच्या मार्गातून नव्हे तर स्वतः प्राणश्वासातून, हे तुम्हाला उमगले, तर तुम्हाला या शरीराशी जोडणारा आयाम स्पष्ट होतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, श्वासाच्या कार्यपद्धतीबद्दल तुम्ही सजग झालात, तर तुम्ही आपले शरीर एका विशिष्ट मोकळेपणाने धारण करू शकता, जसे तुम्ही आपले कपडे हाताळता. जेव्हा ते नको असेल, तेव्हा तुम्ही ते बाजूला ठेवू शकता.

योगामध्ये श्वासाभोवती अगणित प्रक्रिया विकसित केल्या गेल्या आहेत. श्वास हा जीवनऊर्जेचे पाच आयाम हाताळण्याचे साधन बनतो. जीवनऊर्जा पाच वेगवेगळ्या रूपांत प्रकट होते; त्यापैकी एकाला  प्राण वायू म्हणतात, जो श्वास आणि विचारप्रक्रिया यांचे नियमन करतो. श्वास आणि विचारप्रक्रिया यांचा थेट संबंध आहे, कारण प्राण वायू या दोन्हींचे नियमन करतो. तुम्ही स्वतःचे बारकाईने निरीक्षण केले, तर तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचारागणिक तुमचा श्वास वेगळा असतो; तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक वस्तूगणिक तुमचा श्वास वेगळा असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तुमचा श्वास सूक्ष्म रीतीने तुमच्या अनुभवाच्या प्रत्येक पैलूचे, विशेषतः मनात घडणाऱ्या चढउतारांचे प्रतिबिंब असतो.

तुमचा श्वास किती नियंत्रित आणि क्रमबद्ध आहे, त्यानुसार मनाच्या क्रियेलाही क्रमबद्धता आणता येते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही भयभीत झालात किंवा घाबरून गेलात, तर श्वास एकदम आखूड होतो. ती एक तीव्र परिस्थिती असल्यामुळे ती तुमच्या लक्षात येते; पण प्रत्येक क्षणी घडणाऱ्या सूक्ष्म गोष्टी बहुतेकांच्या लक्षातच येत नाहीत. प्राणायाम नावाचे एक संपूर्ण शास्त्रच आहे. "प्राण" म्हणजे जीवनऊर्जा, आणि "याम" म्हणजे नियंत्रण किंवा प्रभुत्व मिळवणे.

प्राणाचा पुढचा आयाम म्हणजे समान वायू, जो शरीरातील 'उष्ण'चे नियमन करतो. "उष्ण" या शब्दाला इंग्रजीत समानार्थी शब्द नाही; सहसा त्याचे भाषांतर "heat" (उष्णता) असे केले जाते, पण ही उष्णता म्हणजे ताप आल्यासारखी उष्णता नव्हे. थर्मामीटरने तपासले, तर तुमचे तापमान सामान्यच असेल. उष्ण म्हणजे अनुभवाला येणाऱ्या उष्णतेची एक विशिष्ट पातळी, ज्यात शरीर उष्ण असल्याचे जाणवते. समान वायूवर थोडे प्रभुत्व मिळवले, तर सर्व जुनाट आजार, ते कोणत्याही स्वरूपाचे असले तरी, सहज शमवता येतात. केवळ एका विशिष्ट जागेत राहून आणि काही साध्या गोष्टी करून आपल्या आजारांतून बाहेर पडलेले लाखो लोक आमच्याकडे आहेत.

प्राणाच्या पुढच्या आयामाला उदान म्हणतात. उदानावर तुमचे काही प्रमाणात प्रभुत्व असेल, तर तुमचे शरीर हलके होते आणि त्यावर गुरुत्वाकर्षणाची पकड कमी होते. याचा अर्थ सर्कशीसारखे खेळ करून हवेत तरंगणे किंवा उडत फिरणे असा नाही. तुमच्यावरील गुरुत्वाकर्षणाची पकड कमी झाली, तर कोणत्याही परिस्थितीत दिवसेंदिवस विश्रांतीशिवाय कार्य करत राहण्याची तुमची क्षमता ही एक सहज प्रक्रिया बनते, कारण तुम्हाला आपले शरीर ओढत न्यावे लागत नाही. तुमच्या अनुभवात शरीर अतिशय हलके होते. मूलतः यामुळे जीवनातील गतिशीलता कितीतरी पटीने वाढते.

पुढचा आयाम म्हणजे अपान. तुम्ही श्वासाबाबत काही गोष्टी केल्या, तर तुमचा आवाज बाहेर पडण्याची पद्धत आपोआप बदलते. मानवी समाजात तुम्ही किती प्रभावी ठरता, हे बहुतांशी तुम्हाला जे काही सांगायचे आहे, ते इतरांपर्यंत पोहोचवण्याच्या तुमच्या क्षमतेवर अवलंबून असते. तुमच्या आवाजाची कंपनसंख्या (फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन) विशिष्ट प्रकारची असेल, तर तुम्ही बोलताना लोक, का ते न कळताच, लक्ष देऊन ऐकतील. तुमची कंपनसंख्या वेगळ्या प्रकारची असेल, तर का ते न कळताच लोक तुम्हाला विरोध करतील.

पाचव्या आयामाला व्यान म्हणतात; तो शरीराचे जतन करणारा पैलू आहे. शांभवी महामुद्रा क्रियेचा सराव करणाऱ्या लोकांवर अभ्यास करण्यात आले आहेत. तीन महिन्यांच्या सरावानंतर लोकांच्या मेंदूच्या उजव्या आणि डाव्या गोलार्धांमधील सुसंगती विलक्षण प्रमाणात उच्च असते, असे या अभ्यासात आढळले. याचा अर्थ तुम्ही आपल्या मेंदूचा कितीतरी अधिक प्रभावीपणे वापर करू शकत आहात. याचे कारण साधे आहे: तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी जुन्या पेशी नष्ट होतात आणि नव्या पेशी तयार होतात; आणि जतन उत्तम प्रकारे होत असल्याने, तयार होणाऱ्या नव्या पेशींची संख्या नष्ट होणाऱ्या जुन्या पेशींच्या संख्येइतकीच असते.

शरीराच्या विविध पैलूंचे नियमन करणारे हे प्राणाचे पाच आयाम आहेत. या सगळ्यासाठी श्वासातून एक मार्ग आहे. हे साध्य करण्याचे इतरही मार्ग आहेत, पण ते कितीतरी अधिक गुंतागुंतीचे आहेत आणि त्यांच्यासाठी खूप अधिक पूर्वतयारी लागते. लोकांसाठी सुरुवात करण्याचा सोपा मार्ग म्हणजे श्वास.

श्वास पूर्णपणे तुमच्यामुळे घडत नाही. भौतिक शरीरात जे सामावलेले आहे, त्यापेक्षा जीवन कितीतरी व्यापक आहे. अगदी स्थूल भौतिक पातळीवरसुद्धा तुम्हाला माहीत आहे की तुम्ही जे बाहेर सोडता, ते झाडे आत घेतात; आणि झाडे जे बाहेर सोडतात, ते तुम्ही आत घेता. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तुमच्या श्वसनयंत्रणेचा अर्धा भाग तिथे बाहेर झाडावर लटकलेला आहे. भौतिक शरीर हा त्याचा केवळ एक भाग आहे. दुसरा भाग सर्वत्र घडत आहे. म्हणून श्वास हा केवळ तुमच्यापुरता मर्यादित नाही; त्याला वैश्विक संदर्भ आहे.