पत्रकारितेची शान वाढविणारे गुरुदास सावळ

ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक, सांस्कृतिक आणि सहकार अशा क्षेत्रात दीर्घकाळ कार्य बजावलेले गुरुदास सावळ यांना १६ नोव्हेंबर रोजी, 'राष्ट्रीय पत्रकार दिनी' गोवा शासनाचा 'पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख.

Story: विशेष |
15th November, 07:50 pm
पत्रकारितेची शान वाढविणारे गुरुदास सावळ

आमचे मित्रवर्य गुरुदास सीताराम सावळ यांना गोवा शासनाचा 'पत्रकारिता जीवन गौरव' पुरस्कार प्राप्त झाल्याने, गोवा शासनाचे राज्य पातळीवरील तीन पुरस्कार पटकावणारे ते एकमेव व्यक्तिमत्त्व आहेत. यापूर्वी त्यांना सहकार क्षेत्रातील कामगिरीबद्दल २०१२-१३ चा 'सहकार रत्न पुरस्कार' तर मराठी भाषेसाठी केलेल्या कामगिरीबद्दल गोवा शासनाचा २०२१-२२ चा 'बा. द. सांतोस्कर भाषा पुरस्कार' प्राप्त झाला आहे. अशा प्रकारे त्यांनी पुरस्कारांची 'हॅट्ट्रिक' साधली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.   

गुरुदास सावळ यांच्याबरोबर गोमंतक मराठी अकादमी, गोमंतक साहित्य सेवक मंडळ, गोवा मराठी पत्रकार संघ या संस्थांत काम करताना त्यांचे कार्य जवळून पाहता आले. सावळ हे अभ्यासू पत्रकार आणि हाडाचे कार्यकर्ते आहेत. त्यांची पत्रकारिता क्षेत्रातील निष्कलंक कारकीर्द, निष्ठा आणि जे सत्य आहे, तेच निष्पक्षपातीपणे मांडण्याची वृत्ती यामुळे त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला. सावळ हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व, त्यांनी सदाच मैत्री जपली. सर्वांशी मिळून मिसळून काम करताना कधीही मोठेपणा मिरवला नाही. नेहमीच साधेपणाने ते वागत आले. विविध क्षेत्रात वावरले, पण कुठल्याही गोष्टीत वाद घालणे हे त्यांच्या तत्त्वात बसले नाही.

पेडणे तालुक्यातील खाजने गावातील, स्वतःची शेती नसलेल्या शेतकरी कामगार दांपत्याच्या पोटी ते जन्मले. व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर राय - सालसेत येथे आपल्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असलेल्या भावाकडे ते गेले. मायणा-कुडतरी येथील सेंट रिटा हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला व एस.एस.सी.ला विद्यालयातून प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला. चौगुले महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना कविता करणे, लघुकथा लिहिणे, वर्तमानपत्रात पत्रे लिहिणे असे छंद त्यांनी जोपासले. मराठी भाषा त्यांना चांगली अवगत असल्याने दै. ‘नवप्रभा’ मध्ये १९७४ मध्ये त्यांना उपसंपादक म्हणून नोकरी मिळाली. उपसंपादक, बातमीदार, ज्येष्ठ बातमीदार अशा विविध पदांवर सावळ यांनी काम केले आणि पत्रकारिता क्षेत्रात स्वतःचा असा ठसा उमटविला. १२ ऑक्टोबर २००७ मध्ये ते निवृत्त झाले, मात्र त्यांनी पत्रकारिता धर्म सोडलेला नाही.   

'ओ हेराल्ड' चे तत्कालीन संपादक राजन नारायण जे प्रुडंट चॅनेलचेही काम पाहत होते, त्यांनी सावळ यांना 'प्रुडंट'चे मुख्य संपादक म्हणून निमंत्रण दिले. ८ वर्षे सावळ यांनी तिथे काम पाहिले व त्यानंतर दै. ‘गोवा दूत’मध्ये ते सहयोगी संपादक म्हणून रुजू झाले. आरोग्याच्या समस्येमुळे मग त्यांनी २०१८ मध्ये राजीनामा दिला. दैनिक ‘नवप्रभा'  व दै. ‘गोवन वार्ता' मध्ये मात्र सावळ यांचे लेख सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. विविध दैनिकांमधून सावळ यांनी आतापर्यंत पाच हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत.   

दै. 'नवप्रभा'मधून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या सदरातील लेखसंग्रहावर 'चक्रव्यूह' पुस्तक प्रकाशित झाले तसेच दै. 'गोवन वार्ता'मधील सदरावर 'गोवा : मुक्ती आणि प्रगती' हे पुस्तक अलिकडेच प्रकाशित झाले. गोवा मुक्त झाल्यापासून ते आतापर्यंतचा प्रवास त्यात आहे. हे पुस्तक म्हणजे ऐतिहासिक दस्तावेज आहे. गुरुदास सावळ हे नेहमीच पत्रकारांच्या भल्यासाठी झटले. त्यांनी 'गुज'चे सात वेळा अध्यक्षपद भूषविले आहे. गोमंतक साहित्य लेखक मंडळाचे ते कोषाध्यक्ष होते. गोमंतक मराठी अकादमीचे ते अध्यक्ष होते. बार्देश बाझार, म्हापसा अर्बन बँक अशा सहकारी संस्थांवर त्यांनी काम केले आहे. अनेक राजकीय उलथापालथीचे साक्षीदार असलेले गुरुदास सावळ हे राजकीय घडामोडींवरील विश्लेषण नेमकेपणाने आणि समतोल राखून करतात.

सावळ यांना 'पत्रकारिता जीवन गौरव' पुरस्कार प्राप्त झाला आहे, याचा समस्त गोमंतकीय पत्रकारांना निश्चितच आनंद व अभिमान असेल. सावळ यांना तो दिल्याने या पुरस्काराची प्रतिष्ठा निश्चितच वाढेल.