सत्तरी तालुक्यातील भिरोंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील अडवई हे गाव, इथल्या अन्य गावांप्रमाणेच हिरवाईच्या वैभवाने नटला होता. सह्याद्रीच्या पर्वतरांगापासून अडवई गाव, जरी दूर असला तरी तेथे एकेकाळी सह्याद्रीतील वृक्षवेलींची संपदा प्रामुख्याने आढळायची. त्यामुळे अडवई गाव हिरवाईने नटलेला होता आणि बारामाही या गावात सिंचन आणि पेयजलाची विशेष वानवा नव्हती. त्यामुळे या गावात गेल्या एक हजाराहून अधिक वर्षांपासून इथे मानवी वस्ती होती. त्यासाठी या गावात विविध प्रांतांतून आलेल्या लोकसमूहांनी शेकडो वर्षांपासून वास्तव्य केलेले आहे.
ग्रामनाम व्युत्पत्तीशास्त्रानुसार 'अडवई' या नावाचा अर्थ 'वनराईने नटलेला प्रदेश' असा होतो आणि शतकापूर्वी हे गाव प्रामुख्याने स्थानिक प्रजातींच्या वृक्षांनी व्यापलेल्या घनदाट जंगलाने समृद्ध होते. 'अडवई' हे नाव मूळ कन्नड भाषेतील 'अडवी' या शब्दापासून उदयास आल्याचे मानले जाते, ज्याचा अर्थ दाट झाडेझुडपे आणि वनस्पतींनी व्यापलेला वनप्रदेश असा होतो. आज या देवराईच्या परिसरात केळबाई देवीचे जुने मंदिर आणि नव्याने उभारलेली वास्तू वसलेली आहे; मात्र, पूर्वीच्या काळी शेतीखाली जमीन आणण्याच्या उद्देशाने झालेल्या जंगलतोडीमुळे या देवराईच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. परंपरेने चालत आलेल्या धार्मिक निर्बंधांमुळे आणि श्रद्धेमुळे गावकरी या देवराईत सहसा प्रवेश करत नाहीत; परिणामी येथील काही वृक्षांनी आजही या परिसराची हिरवाई टिकवून धरली आहे.
भूतकाळात अडवई गावातील या घनदाट देवराईत सातेरी-शांतादुर्गा, केळबाई, ब्राह्मणी, घाडवस, पाचवस आणि पुरमार या ग्रामदेवतांची श्रद्धास्थाने वसलेली होती. देसाईवाड्याजवळील 'किरकरे' येथील 'पाड्यापूर्वजाचे पाषाण' म्हणून ओळखला जाणारा भाग हा खरेतर याच मुख्य देवराईचा एक विखंडित असा हिस्सा आहे. तेथे कोसमाचे या प्रजातीचे तीन भव्य वृक्ष, हेदूचा एक वृक्ष आणि सागवान त्याचप्रमाणे अन्य स्थानिक पानझडी वृक्षांच्या प्रजाती, तसेच विविध वेली आणि महावेलींनी या परिसराच्या एकंदर नैसर्गिक व पर्यावरणीय सौंदर्यात मोलाची भर घातलेली आहे.
'पाड्यापूर्वजाचे पाषाण' या ठिकाणी लोकदैवत रवळनाथाच्या दोन भग्न पाषाणमूर्ती आहेत. परंतु, जुन्या काळी पूर्वजांनी या मूर्तींजवळ न जाण्याचे आणि त्यांची पूजा न करण्याचे निर्देश दिल्यामुळे, आजसुद्धा कोणताही गावकरी या भागात जाण्याचे धाडस करत नाही किंवा तेथे कोणतेही धार्मिक विधी पार पाडत नाही. या राईत विखुरलेल्या जांभ्या दगडांच्या चिऱ्यांवरून शतकाहून अधिक काळापूर्वी येथे मंदिर अस्तित्वात असल्याचे स्पष्ट पुरावे मिळतात. मात्र, आज रस्ते, पूल, वसंत बंधारे आणि विविध प्रकारच्या सिमेंट-काँक्रिटच्या बांधकामांमुळे गावाला पिढ्यानपिढ्या लाभलेल्या जलस्रोत आणि पर्यावरणीय संतुलनाला मोठा धोका निर्माण झाला आहे. असे असले तरीही, ही देवराई आजही गोव्याचे राज्य फुलपाखरू असलेल्या 'मलबार ट्री निम्फ' याच्यासह 'ब्लू मॉर्मन' आणि इतर अनेक प्रजातींच्या फुलपाखरांना आपल्याकडे आकर्षित करते.
पोर्तुगीज राजवटीत सुरू झालेल्या धार्मिक छळाच्या काळात तिसवाडी तालुक्यातील करमळी गावातून स्थलांतरित होऊन आलेले लोक आज अडवईत स्थायिक आहेत. या देवराईव्यतिरिक्त, गावात एक नैसर्गिक गुहादेखील आहे, जिथे 'आजोबा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका अदृश्य, पवित्र लोकदैवताचा वास असल्याची गावकऱ्यांची दृढ श्रद्धा आहे.
या समृद्ध आणि घनदाट जंगलामुळे गावात पूर्वी बारमाही वाहणारे पाण्याचे स्रोत होते. या पाण्याचा वापर शेती आणि बागायती पिकांना सिंचनासाठी केला जात असे, ज्यासाठी पूर्वी मातीचे बंधारे घातले जात; पुढे त्यांची जागा गोवा सरकारच्या जलसंसाधन खात्याने नियोजित करून बांधलेल्या 'वसंत बंधाऱ्यां'नी घेतलेली आहे. या देवराईत पानझडी वृक्षांच्या जोडीनेच केवड्याच्या वनस्पतींचेही मोठे प्राबल्य होते, त्यामुळे येथे पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी आणि इतर वन्यजीवांना वावरण्यास पोषक अधिवास लाभला होता.
देववने ही आपल्या देशात प्राचीन कालखंडापासून प्रचलित असलेल्या समृद्ध अशा धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतून उद्गम पावलेली संपदा होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या आततायी प्रभावामुळे आम्ही पूर्वजांनी विशिष्ट हेतूने निर्माण केलेल्या परंपरांकडेही पूर्णपणे कानाडोळा केल्याने, अशा देवराया आज झपाट्याने विकास प्रकल्पांच्या वावटळीत विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहेत. सत्तरीतील अडवई गावात कधीकाळी निसर्ग आणि पर्यावरण मूल्यांचे पालन करणाऱ्या जंगल निवासी लोकसमूहांचे प्राबल्य होते. परंतु त्यांचे पूर्णपणे उच्चाटन करून, नव्याने स्थायिक झालेल्या लोकसमूहांनी जल, जंगल, जमीन आणि जैविक संपदा या घटकांना गौण स्थान दिले. त्यामुळे अशा वृक्षवेलींनी त्याचप्रमाणे बारामाही निरंतर वाहणाऱ्या खळाळत्या झऱ्यांनी, ओहळांनी आणि पाण्याने समृद्ध असलेल्या तलावांनी नटलेला हा गाव, सिंचन आणि पेयजल यांच्यासाठी परावलंबी होण्याच्या मार्गावर आहे. लोहखनिजाप्रमाणे, काळ्या आणि जांभ्या दगडांच्या खाणींसाठी हा गाव आकस्मिकपणे नावारूपास आल्याने, त्याच्यावर वर्तमान आणि भविष्यकाळात पाण्यासाठी दुरवस्था ओढवणार नाही ना? असे प्रश्न प्रकर्षाने पुढे येऊ लागलेले आहेत.
आज सत्तरी तालुक्यातील हा गाव झपाटयाने आपले जंगल वैभव हरवत असल्याने, अडवईत जेवढे नैसर्गिक वृक्षाच्छादन शिल्लक राहिलेले आहे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी स्थानिक जनतेने सक्रिय होणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान सरकारला देवराईचे सर्वेक्षण करून, कायदेशीररित्या संरक्षण करण्याचा जो आदेश दिला होता, तो गोव्यालाही लागू होत असताना, गोवा सरकारच्या वन खात्याने या बाबींकडे हेतुपुरस्सररित्या दुर्लक्ष केलेले आहे. यापूर्वी अडवईतील ग्रामस्थांनी आपल्या गावातील जमीन बाहेरच्या व्यक्तींना न विकण्यासंदर्भात जसा सामूहिक निर्णय घेतलेला आहे, त्याचप्रमाणे आपण गावातील देववृक्ष, देवराया यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेऊन, त्याची योग्यरितीने अंमलबजावणी करण्याची नितांत गरज आहे.
एकेकाळी निसर्ग आणि पर्यावरणात दिव्यत्वाची प्रचिती घेऊन, त्याच्या रक्षणाला महत्त्व देणाऱ्या अडवई ग्रामस्थांनी देवराईचे अस्तित्व टिकवण्यासाठी कार्यप्रवण होणे महत्त्वाचे आहे.

- राजेंद्र पां. केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५


