बरेली : दहशतवादी संघटनांना अडीच कोटी रुपये पाठवल्याचा गंभीर आरोप करत उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका नामांकित पारंपरिक औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरला सायबर भामट्यांनी रात्रभर ‘डिजिटल अरेस्ट’ करून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लखनौ एटीएसचे अधिकारी असल्याचे भासवून या भामट्यांनी डॉक्टरला अटक करण्याची धमकी दिली. मात्र, डॉक्टर वेळीच आलेल्या संशयामुळे आणि पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठी आर्थिक फसवणूक टळली.
डॉ. खुर्शीद मुराद सिद्दीकी असे या डॉक्टरचे नाव आहे. शुक्रवारी रात्री सुमारे ८ वाजता त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला. फोन करणाऱ्या महिलेने आपण लखनौ एटीएसची अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने एका पुरुषाला फोनवर जोडले. त्याने स्वतःला वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले.
डॉक्टरांच्या आधार कार्डचा वापर करून पश्चिम बंगालमधील हुगळी येथे बँक खाते उघडण्यात आले आहे. त्या खात्यातून दहशतवादी संघटनांना तब्बल अडीच कोटी रुपये पाठवण्यात आल्याचा बनाव या भामट्यांनी रचला. एका अटक केलेल्या दहशतवाद्याच्या चौकशीत डॉक्टरांचे नाव समोर आल्याचे सांगत त्यांच्या नावाने अटक वॉरंटही जारी झाल्याची धमकी देण्यात आली.
कुटुंबीयांशी बोलण्यासही मनाई
तपास सुरू असल्याचे सांगून डॉक्टरांना मोबाईल सतत सुरू ठेवण्यास आणि कोणाशीही संपर्क न साधण्यास सांगण्यात आले. या धमक्यांमुळे घाबरलेल्या डॉक्टरांनी स्वतःला घरातील एका खोलीत कोंडून घेतले. कुटुंबीयांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणालाही खोलीत येऊ दिले नाही. मुलालाही खोलीत प्रवेश करू नको, अशी ताकीद दिली. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले.
आरटीजीएस फॉर्ममुळे संशय बळावला
डॉक्टरांच्या सर्व बँक खात्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगत भामट्यांनी त्यांच्यावर दबाव वाढवला. दुसऱ्या दिवशी बँक सुरू होताच आरटीजीएस फॉर्म भरून मोठी रक्कम हस्तांतरित करण्यास सांगण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, बँकेत जाऊन आरटीजीएस फॉर्म भरण्याच्या सूचनेमुळे डॉक्टरांना संशय आला.
शनिवारी सकाळी त्यांनी आपली व्यथा व्यवस्थापकाला सांगितली. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी चौकशी केली असता फोन करणारे तोतया अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले. एटीएसच्या नावाचा वापर करून डॉक्टरांना दहशतीखाली ठेवत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा हा सायबर भामट्यांचा प्रयत्न असल्याचे उघड झाले.
पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे डॉक्टरांची आर्थिक फसवणूक टळली. सरकारी तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना अटक आणि गंभीर गुन्ह्यांची भीती दाखवण्याचे सायबर गुन्हेगारांचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी अशा फोन कॉल्सना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.


