इम्फाळ : मणिपूरमध्ये विषारी दारूने हाहाकार माजवला आहे. विषारी दारू प्यायल्याने अनेक कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. चंदेल जिल्ह्यात विषारी दारूचे सेवन केल्यानंतर आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. (Poisonous alcohol consumption causes havoc in Manipur : 15-dead) ३०० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिथेनॉलच्या विषबाधेमुळे ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
१८ नोव्हेंबरपासून मृत्यूंची नोंद होत आहे. चाकपिकारोंग आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. विषबाधेची लक्षणे दिसू लागल्यानंतर बाधितांना उपचारांसाठी इम्फाळ येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय विज्ञान संस्था (जेएनआयएमएस), रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स), शिजा हॉस्पिटल आणि बाबिना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णांना चक्कर येणे, पोटदुखी आणि अन्य त्रास जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही रुग्णांवर डायलिसिसद्वारे उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी शिजा आणि बाबिना हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच उपचारांचा आढावा घेतला. शिजा हॉस्पिटलमध्ये १४० हून अधिक, तर बाबिना हॉस्पिटलमध्ये ४१ हून अधिक रुग्ण दाखल असल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत मृत्यूचा आकडा १५ वर पोहोचला आहे.
दोषींवर कठोर कारवाई : मुख्यमंत्री
रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि उपचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये नमूद केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी औषधोपचार तज्ज्ञाच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक तसेच आवश्यक औषधांचा साठा चंदेल जिल्ह्यात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
दरम्यान, शिजा हॉस्पिटलमध्ये संशयित मिथेनॉल विषबाधेची ३१२ हून अधिक प्रकरणे हाताळण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. जेएनआयएमएसमधील एका डॉक्टरांच्या माहितीनुसार, काही रुग्णांनी स्थानिक पातळीवर तयार केलेली दारू प्यायली होती. भीतीपोटी त्यांनी तातडीने रुग्णालय गाठले.
प्राथमिक माहितीनुसार, ही संशयास्पद दूषित दारू शेजारील काकचिंग जिल्ह्यातील सुग्नू येथून खरेदी करण्यात आली होती. चंदेलच्या आमदार एस. एस. ओलिश यांनी बाधित भागातील आणखी रुग्णांना इम्फाळमध्ये उपचारांसाठी आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, त्यांनी परिस्थिती हाताळण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक पक्ष कार्यकर्तेही रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी वाहनांची व्यवस्था करत आहेत. विषारी दारूच्या सेवनामुळे झालेल्या या दुर्घटनेने संपूर्ण मणिपूरमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दारूच्या स्रोताचा आणि त्यातील विषारी घटकांचा शोध घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.


