वास्को : फ्लॅट भाड्याने देण्याच्या नावाखाली करण्यात आलेल्या फसवणूक प्रकरणात गेल्या काही वर्षांपासून फरार असलेल्या अहमद नूर याला अखेर वास्को पोलिसांनी (Vasco Police) उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. २०२२ मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात आरोपी पोलिसांना वारंवार गुंगारा देत होता.
यापूर्वीही फरार असताना अहमद नूर याला नेपाळमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला पुन्हा अटक झाली आणि न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा पलायन केले होते. तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते.
अखेर वास्को पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्याचा ठावठिकाणा शोधून काढला आणि उत्तर प्रदेशातून त्याला अटक केली. वारंवार कायद्याच्या कचाट्यातून निसटण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपीला पुन्हा अटक झाल्याने या फसवणूक प्रकरणाच्या तपासाला दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.


