लुकआऊट नोटीसनंतर अजित शंखवाळकर पणजी पोलिसांना शरण

बनावट अबकारी आयुक्त प्रकरणातील फरार संशयित अजित शंखवाळकर अखेर पणजी पोलिसांना शरण आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी गोवा पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआउट नोटिस जारी केली होती.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
लुकआऊट नोटीसनंतर अजित शंखवाळकर पणजी पोलिसांना शरण

पणजी : बनावट अबकारी आयुक्त प्रकरणातील मुख्य संशयित अजित शंखवाळकर याने अखेर पणजी पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तिपत्रे तयार करणे आणि त्याद्वारे लाखो रुपये उकळल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तो फरार होता आणि पोलिसांकडून त्याच्या शोधासाठी लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती.

हा संपूर्ण प्रकार ऑक्टोबर महिन्यात समोर आला होता. मनोज तळेकर नावाची व्यक्ती पणजीतील अबकारी आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचली आणि आपली अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचा दावा करत सरकारी नियुक्तिपत्र सादर केले. मात्र, कर्मचाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी वरिष्ठांकडे खातरजमा केली आणि अशी कोणतीही नियुक्ती झाली नसल्याचे उघड झाले. प्राथमिक तपासात ते पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीदरम्यान मनोज तळेकर याने नोकरीच्या बदल्यात अजित शंखवाळकरला २७ लाख रुपये दिल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे. अबकारी खात्याचे सहाय्यक आयुक्त संकेत साखरदांडे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तत्कालीन उत्पादन शुल्क आयुक्त अश्विन चंद्रू यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप तक्रारीत आहे.

या प्रकरणात आर्थिक फसवणुकीची व्याप्ती अधिक असल्याचे तक्रारीतून दिसून येते. मनोज तळेकर यांचे वडील गोविंद तळेकर यांनी दिलेल्या स्वतंत्र तक्रारीनुसार, मुलाच्या नोकरीसाठी २७ लाख आणि मुलीला लेखा विभागात नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनावर २५ लाख रुपये, असे एकूण ५२ लाख रुपये घेतल्याचा आरोप शंकवाळकरवर आहे. याशिवाय पर्वरीतील कोम्युनिदाद जमिनीच्या व्यवहारातही सुमारे ८० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला असून, कथित एकूण नुकसान १ कोटी ३२ लाख रुपयांपर्यंत जात असल्याचे सांगितले जाते. शंखवाळकर स्वतःला पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवत तसेच पोलीस व राजकीय वर्तुळातील ओळखींचा प्रभाव दाखवून उमेदवारांचा विश्वास संपादन करत असल्याचे तपासाशी संबंधित वृत्तांत नमूद करतात.

अजित शंखवाळकरच्या अटकेनंतर आता या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. त्याने आणखी कोणाकडून पैसे घेतले, या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यात कोणाचा सहभाग होता, याचा शोध पोलिसांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. या सर्व आरोपांची सत्यता पुढील सखोल तपासातूनच स्पष्ट होईल.

हेही वाचा
सर्व पहा