म्हापसा : बार्देशमधील (Bardez Taluka) आसगाव येथे गेल्या काही दिवसांमागे दुकानाला आग लागून जखमी झालेल्या आणखी एकाचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकाॅ) उपचार सुरू असताना मृत्यू झाला. संजय मडगावकर (वय ५९, रा. आसगाव) असे त्याचे नाव आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
आगीत भाजलेल्या रत्नेश चव्हाण (वय १९, मूळ या. उत्तर प्रदेश) याचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांच्यावरही गोमेकाॅत उपचार सुरू होते. या दुर्घटनेत दोघांचे बळी गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी आसगाव येथे आग्नेल हायस्कूल जवळ असलेल्या एका दुकानाला आग लागण्याची भीषण घटना घडली होती. त्यात तिघेजण होरपळून गंभीर जखमी झाले होते. तिघांपैकी दोघेजण उपचार सुरू असताना मृत्यू पावले तर एकावर गोमेकाॅत उपचार सुरू आहेत.


