विधानसभा निवडणूक : आज दिल्लीत काँग्रेसची खलबते

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, अन्य दोन आमदार आणि दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
विधानसभा निवडणूक : आज दिल्लीत काँग्रेसची खलबते

पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची संभाव्य युती आणि निवडणूक रणनीती यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, अन्य दोन आमदार आणि दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. मंगळवारी दिल्लीत ही महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती गोवा काँग्रेसकडून मिळाली.
या बैठकीसंदर्भात बोलताना खासदार विरियातो फर्नांडिस म्हणाले की, मंगळवारी दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. मात्र पूर्वनियोजित सरकारी कार्यक्रम असल्याने बैठकीला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. कार्यक्रम लवकर संपला आणि विमान उपलब्ध झाले, तर बैठकीला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी आपल्याला बैठकीसाठी दिल्लीत बोलावण्यात आले असून आपण बुधवारी दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची आरजी आणि गोवा फॉरवर्ड पक्षासोबत युती करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र आम आदमी पक्षाकडून काँग्रेसवर सातत्याने टीका होत असल्याने या युतीमध्ये आप सहभागी होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून सोमवारपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘गोवा राखण यात्रा’ पूर्ण झाल्यानंतर गोव्याच्या राजकीय परिस्थितीवर काँग्रेसची दिल्लीत होणारी ही पहिलीच महत्त्वाची बैठक आहे.

हेही वाचा
सर्व पहा