पणजी : भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून आणि अटकेची भीती दाखवून शिरोडा, फोंडा येथील ६८ वर्षीय ज्येष्ठ महिलेची १६ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅप क्रमांकधारकांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत तक्रारदार ज्येष्ठ महिलेला चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सअॅप कॉल करण्यात आले. समोरील व्यक्तीने आपण आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी केली. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर मानवी तस्करी प्रकरणात ‘सदातक खान’ नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडे तुमची कागदपत्रे सापडली आहेत, अशी भीती या भामट्यांनी महिलेला घातली.
मात्र, ही रक्कम जमा केल्यानंतर ती परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे ज्येष्ठ महिलेच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ गोवा पोलिसांच्या सायबर विभागात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत अज्ञात सायबर भामट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-डी अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
पडताळणीच्या बहाण्याने उकळले पैसे
अटकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तुमच्या बँक खात्यातील रकमेची सत्यता पडताळणे आवश्यक आहे, असे सांगत भामट्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला. पडताळणीच्या बहाण्याने तक्रारदार महिलेला कोटक महिंद्रा बँक आणि बंधन बँकेच्या दोन वेगवेगळ्या खात्यांत टप्प्याटप्प्याने १६ लाख रुपये जमा करण्यास भाग पाडण्यात आले.


