पणजी : बाणस्तारी पुलावर ६ ऑगस्ट २०२३ रोजी मेघना सिनाय सावर्डेकर यांच्या मालकीच्या मर्सिडिझ कारने सहा वाहनांना ठोकरले होते. त्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तर तिघे जखमी झाले होते. या प्रकरणी फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पुढील कारवाईसाठी मेरशी येथील सत्र न्यायालयात खटला वर्ग केला आहे. या प्रकरणात कार चालक श्रीपाद उर्फ परेश सिनाय सावर्डेकर याच्यासह अॅड. अमित पालेकर, गणेश लमाणी, अभिजित शेट्ये, विष्णू तारकर, अत्रेय सावंत आणि प्रज्योत चोडणकर यांना संशयित आरोपी केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सत्र न्यायालयात २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
या प्रकरणी म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे तत्कालीन उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर यांनी ७ आॅगस्ट २०२३ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, रविवार, ६ ऑगस्ट २०२३ रोजी खाडेंपार-फोंडा येथील पार्टी संपवून पणजीकडे येताना बाणस्तारी पुलावर मेघना सिनाय सावर्डेकर यांच्या मालकीच्या मर्सिडिझ कारने सहा वाहनांना ठोकरले होते. त्या अपघातात सुरेश फडते, भावना फडते या दाम्पत्यासह अरूप करमाकर यांचा मृत्यू झाला होता. तर वनिता भंडारी, शंकर हळर्णकर आणि राज माजगावकर हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी कारचालक श्रीपाद उर्फ परेश सिनाय सावर्डेकरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले. गुन्हा शाखेने या प्रकरणी चौकशी केली असता, अपघात झाल्यानंतर परेश सिनाय सावर्डेकर याने फोन करून गणेश लमाणी आणि अॅड. अमित पालेकर या दोघांना जुवारवाडो - माशेल येथील अत्रे सावंत याच्या घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी अभिजित शेट्ये, विष्णू तारकर आणि प्रज्योत चोडणकरही त्या ठिकाणी आले. त्यानंतर पालेकर व इतरांनी तोतया चालक लमाणी कार चालवत होता. तर परेश त्याच्या बाजूला बसल्याचे पोलिसांना पटवून दिले. त्यामुळे पोलिसांनी तोतया चालक लमाणी याच्यासह परेश सिनाय सावर्डेकर याची वैद्यकीय चाचणी केली असता, त्यात तोतया चालकाचा दारूचे प्रमाणाचा अहवाल नकारात्मक तर परेश याचा दारूचे प्रमाणाचा अहवाल सकारात्मक आला. त्यानंतर पोलिसांनी तोतया चालक गणेश लमाणी याची अधिक चौकशी केली असता, परेश कार चालवत असल्याचे त्याने जबानी दिली. त्यानुसार, पोलिसांनी परेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. दरम्यान षड्यंत्र रचून पोलिसांची दिशाभूल केल्या प्रकरणी गुन्हा शाखेने अॅड. अमित पालेकर याच्यासह इतरांना गुन्ह्यात जोड कलम लावून संशयित केले. त्यानंतर गुन्हा शाखेने अॅड. अमित पालेकर आणि तोतया चालक गणेश लमाणी या दोघांना अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्या दोघांना सशर्त जामीन मंजूर केला. याच दरम्यान कार मालक मेघना सिनाय सावर्डेकर याला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. दरम्यान अटकपूर्व सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने मेघना यांना मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला आणि जखमींना भरपाई देण्याबाबत विचारपूस केली होती. त्यावेळी मेघना हिने स्वतःहून २ कोटी रुपये देण्याची, तसेच गंभीर जखमी हळर्णकर यांच्या उपचारावर खर्च करण्याची तयारी दाखवली. त्यानुसार, न्यायालयाने ५० लाख रुपये फडते कुटुंबाला, ५० लाख रुपये अरूप करमाकर यांच्या कुटुंबाला, तसेच जखमींना प्रत्येकी २५ लाख रुपये दिले जातील. मात्र, भरपाईविषयी तसेच खटल्याशी संबंधित न्यायालयात या रकमेचा काहीही संदर्भ राहणार नसल्याचा स्पष्ट केले. या प्रकरणी गुन्हा शाखेचे तत्कालीन निरीक्षक निनाद देऊळकर यांनी तपास पूर्ण करून फोंडा प्रथमवर्ग न्यायालयात १,१५८ पानी आरोपपत्र दाखल केले होते. त्यात १२१ साक्षीदारांची साक्ष नोंद केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने सुनावणी घेऊन पुढील कारवाईसाठी सत्र न्यायालयाकडे खटला वर्ग केला.
पीडितांचा नुकसान भरपाईसाठी अर्ज
अपघात पिडीतांनी फोंडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल केले आहे. त्यात त्यांनी मृत्यू झालेल्यांच्या प्रत्येकी ५० लाख, तर गंभीर जखमींना प्रत्येकी २५ लाख तसेच किरकोळ जखमी झालेल्याला १० लाख रुपये भरपाईची मागणी केली आहे. यावर अजून न्यायालयात सुनावणी सुरु आहेत.


