म्हापसा पालिकेकडून पे-पार्किंगसाठी निविदा जारी

वर्षभरासाठीच्या या कंत्राटाची मूळ किंमत ७५ लाख ६० हजार रुपये आहे. राफयातील नोंदणीकृत एजन्सींना ३० नोव्हेंबरपर्यंत निविदेसाठी अर्ज करता येणार असून, २ डिसेंबर २०२६ रोजी निविदा खुली केली जाणार आहे.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd November, 11:26 pm
म्हापसा पालिकेकडून पे-पार्किंगसाठी निविदा जारी

म्हापसा : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहन पार्किंगला आळा घालण्यासह बाजारपेठेतील पार्किंग व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी म्हापसा नगरपालिकेने पे-पार्किंग शुल्क वसुलीचे कंत्राट देण्यासाठी ई-निविदा जारी केली आहे. वर्षभरासाठीच्या या कंत्राटाची मूळ किंमत ७५ लाख ६० हजार रुपये आहे. राफयातील नोंदणीकृत एजन्सींना ३० नोव्हेंबरपर्यंत निविदेसाठी अर्ज करता येणार असून, २ डिसेंबर २०२६ रोजी निविदा खुली केली जाणार आहे.
उत्तर गोव्याचे प्रमुख व्यापारी केंद्र आणि बार्देश तालुक्याची राजधानी असलेल्या म्हापसा शहरात दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. मात्र अनियंत्रित वाहन पार्किंगमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने पे-पार्किंग व्यवस्थेची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
यापूर्वीच्या कंत्राटात जादा दर आकारणी आणि विविध वादांमुळे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे जुन्या त्रुटी दूर करून वाहनचालकांची फसवणूक रोखण्यासाठी पालिकेने नव्या निविदेत कडक अटींचा समावेश केला आहे.
नव्या अटींनुसार, वाहनचालकांशी गैरवर्तन करणे, अवाजवी पैसे उकळणे किंवा निर्धारित दरांपेक्षा जास्त शुल्क आकारणे अशा प्रकारांसाठी संबंधित कंत्राटदाराला १० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. तसेच कंत्राट रद्द करून अनामत रक्कम जप्त करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
शुल्क वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पिवळा गणवेश आणि ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दररोज ५०० रुपये दंड आकारला जाईल. शुल्क वसुलीत पारदर्शकता राहावी यासाठी डिजिटल मशीनद्वारे पावती देणे आणि तीन महिन्यांच्या आत ‘पार्क प्लस’ प्रणालीशी जोडणी करणे बंधनकारक आहे.

पे-पार्किंगचे अधिकृत दर
दिवसा (सकाळी ७ ते रात्री ८) पहिल्या दोन तासांसाठी दुचाकीला १० रुपये, तर चारचाकीला २० रुपये शुल्क आकारले जाईल. त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त तासासाठी दुचाकीला ५ रुपये आणि चारचाकीला १० रुपये द्यावे लागतील.
रात्री (रात्री ८ ते सकाळी ७) पहिल्या दोन तासांसाठी दुचाकीला २० रुपये, तर चारचाकीला ५० रुपये शुल्क असेल. त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त तासासाठी दुचाकीला १० रुपये आणि चारचाकीला २० रुपये आकारले जातील.
टॅक्सी स्टँडवर २४ तास, तर इतर ठिकाणी केवळ सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेतच पे-पार्किंग शुल्क वसूल करता येईल. पे-पार्किंगची ठिकाणे दर्शविणारे डिजिटल फलक लावणे आवश्यक आहे. तसेच नगरसेवक आणि पालिका कर्मचाऱ्यांना पार्किंग शुल्क आकारण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

पे-पार्किंग लागू होणारा परिसर...
म्हापसा मार्केट, युनियन फार्मसी ते लोजा चिमुलकर रस्ता, कॅनरा बँक, आराम सोडा इमारत, चणा दुकान आळी, विभागीय शिक्षणाधिकारी कार्यालय परिसरातील दोन्ही बाजू, म्हापसा क्लिनिक ते केणीवाडा येथील प्रभावती निवास आणि टॅक्सी स्टँड या ठिकाणी पे-पार्किंग सुविधा लागू होणार आहे.