अखेरचा हा तुला दंडवत! नाना पाटेकर यांना साश्रूनयनांनी निरोप

डोणजे येथील शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; मान्यवरांसह हजारो चाहत्यांची उपस्थिती : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी रात्री उशिरा पुणे जिल्ह्यातील डोणजे गावातील त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकूल वातावरणात कुटुंबीय, मित्रपरिवार, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील सहकारी आणि हजारो चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप दिला.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
अखेरचा हा तुला दंडवत! नाना पाटेकर यांना साश्रूनयनांनी निरोप

पुणे : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar)  यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी रात्री उशिरा पुणे जिल्ह्यातील डोणजे गावातील त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकूल वातावरणात कुटुंबीय, मित्रपरिवार, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील सहकारी आणि हजारो चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप दिला.

नाना पाटेकर यांच्या अंत्यदर्शनासाठी डोणजे गावात सकाळपासूनच चाहत्यांची गर्दी होऊ लागली होती. आपल्या लाडक्या अभिनेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर दाखल झाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि नाना यांचे ‘नाम फाउंडेशन’मधील सहकारी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तत्पूर्वी पुणे येथे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Chier Minister)  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनीही त्यांचे दर्शन घेतले व शवपेटीलाही हात दिला.

अंतिम इच्छेनुसार शेतात अंत्यसंस्कार

नाना पाटेकर यांनी काही वर्षांपूर्वीच आपल्या पार्थिवावर डोणजे येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांच्या शेतात अंत्यविधीची व्यवस्था करण्यात आली. अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यांच्या अभिनयाच्या आठवणी, सामाजिक कार्यातील योगदान आणि जिव्हाळ्याच्या स्वभावाचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

गोव्यात घेतला होता अखेरचा श्वास

नाना पाटेकर यांनी गुरुवारी पहाटे गोव्यात पणजीजवळील दोनापावला येथे अखेरचा श्वास घेतला होता. ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती बिघडली व नंतर त्यातच त्यांचे निधन झाले. मध्यरात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी जवळच्या एका मित्राला संदेश पाठवून प्रकृतीबाबत कळवले. मात्र, रात्री उशिराची वेळ असल्याने मित्राचे त्या संदेशाकडे तत्काळ लक्ष गेले नाही. पहाटे चारच्या सुमारास संदेश वाचल्यानंतर मित्राने तातडीने त्यांच्या घरी धाव घेतली.

त्यानंतर रुग्णवाहिका त्यांच्या घरी दाखल झाली. मात्र, त्यावेळी नाना यांच्या हालचाली बंद झाल्या होत्या. त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने सुमारे ४५ मिनिटे त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारांना यश आले नाही. अखेर पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्रभावी अभिनेत्याचा प्रवास कायमचा संपला

नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एका प्रभावी अभिनेत्याचा प्रवास कायमचा संपला आहे. आपल्या दमदार अभिनयाने, अष्टपैलू भूमिकांनी आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्याने त्यांनी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील. 

हेही वाचा
सर्व पहा