नवी मुंबई : सायबर फसवणुकीतून मिळालेला पैसा वळवण्यासाठी बँक खाती आणि सिमकार्ड उपलब्ध करून देणाऱ्या ‘म्युल अकाउंट’द्वारे करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली तर एका १६ वर्षीय अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कारवाईदरम्यान ७२ एटीएम कार्ड, ५२ सिमकार्ड, १८ मोबाईल फोन, तीन लॅपटॉप, पेनड्राइव्ह, मेमरी कार्ड, प्रीपेड कार्ड, सात गेमिंग कार्ड, क्रिप्टोकरन्सी वॉलेटसाठी वापरले जाणारे डोंगल, तसेच ५७ हजार रुपये रोख आणि एक किया सोनेट कार जप्त केली आहे.

रायगड पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली. राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवरील (NCCRP) तक्रारींच्या तपासादरम्यान संशयास्पद बँक खात्यांची माहिती समोर आली. या खात्यांविरोधात मोठ्या प्रमाणात सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद झाल्याचे तपासात आढळले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कमिशनच्या मोबदल्यात नागरिकांकडून बँक खाती, एटीएम कार्ड, चेकबुक, पासबुक आणि सिमकार्ड मिळवत होते. ही खाती नंतर बनावट गुंतवणूक योजना, पार्टटाइम नोकरीचे आमिष, ‘डिजिटल अरेस्ट’ तसेच शेअर बाजाराशी संबंधित सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी वापरली जात असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी २० जुलै रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) आणि ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला पेन येथील उंबरडेफाटा येथील मयूर विलास म्हात्रे (२५) आणि आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील पवनकुमार चिलीमुंटा (२३) यांना ताब्यात घेण्यात आले.
तपासात मयूर म्हात्रे हा कमिशन देऊन म्युल बँक खाती आणि सिमकार्डची व्यवस्था करत असल्याचे समोर आले. ही खाती व सिमकार्ड कुरिअरद्वारे पुणे आणि हैदराबाद येथील मुख्य सूत्रधारांकडे पाठवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवनकुमार हा ही खाती व सिमकार्ड पुढे पाठवण्यासोबतच एटीएमद्वारे फसवणुकीची रक्कम काढत असल्याचा आरोप आहे.
तांत्रिक तपासातून पुण्यातील चारोली येथे राहणारे अभिषेक गुप्ता (१९) आणि अमनकुमार गुप्ता (२२), तसेच १६ वर्षीय अल्पवयीनाचा सहभाग समोर आला. हे सर्व मूळचे उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. अमनकुमार हा म्यूल खाती व सिमकार्ड मिळवून त्यांचा वापर करून आलेली रक्कम युएसडीटी (USDT) क्रिप्टोकरन्सी वॉलेटद्वारे परदेशात पाठवत असल्याचा संशय आहे. अल्पवयीनाचाही अशाच प्रकारे रक्कम परदेशात पाठवण्यासाठी वापर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
कानपूर येथील वंश जितेंद्रकुमार सिंह (२१) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तो टेलिग्रामवरील विविध हँडलर्सच्या माध्यमातून म्युल खाती आणि सिमकार्ड मिळवत असल्याचा आरोप आहे. ही माहिती कुरिअरद्वारे विविध ठिकाणी पाठवली जात होती. पोलिसांच्या मते, संबंधित खात्यांमधील रक्कम युएसडीटी वॉलेटसह गेमिंग आणि ऑनलाइन जुगाराच्या वेबसाईट्समार्फत पुढे वळवली जात होती.
रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज घाटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय मोहिते आणि पथकाने तपास केला.
सायबर फसवणुकीला खतपाणी घालणाऱ्यांवरही कारवाई
आपले बँक खाते, एटीएम कार्ड किंवा सिमकार्ड पैशांच्या मोबदल्यात दुसऱ्याला देणे हा गंभीर प्रकारआहे. अशा माध्यमातून सायबर फसवणुकीला मदत होते, असा इशारा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी दिला. या प्रकरणातील संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून, म्यूल खाती उपलब्ध करून देणारे, फसवणुकीची रक्कम वळवणारे आणि परदेशात पाठवणारे आणखी आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.


