चार पोलीस कॉन्स्टेबलना भोवला बेशिस्तपणा; पुण्यातून पाठवले माघारी

आपत्ती आणि आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याचे विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्यात गेलेल्या गोवा पोलिसांच्या चार काॅन्स्टेबलनी बेशिस्तपणा केला. त्यामुळे एनडीआरएफने त्या चौघांविरोधात अहवाल सादर करून त्यांना गोव्यात परत पाठवले आहे. या प्रकाराची गोवा पोलिसांनी गंभीर दखल घेऊन त्यांच्याविरोधात खात्याअंतर्गत चौकशी सुरू केली आहे.


just now
चार पोलीस कॉन्स्टेबलना भोवला बेशिस्तपणा; पुण्यातून पाठवले माघारी

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
आपत्ती आणि आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याचे विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्यात गेलेल्या गोवा पोलिसांच्या चार काॅन्स्टेबलनी बेशिस्तपणा केला. त्यामुळे पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) त्या चार जणांविरोधात अहवाल सादर करून त्यांना गोव्यात परत पाठवले आहे. दरम्यान, वरील प्रकाराची गोवा पोलिसांनी दखल घेऊन त्यांच्याविरोधात खात्याअंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
​राज्यात आपत्ती आणि आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (एसडीआरएफ) २९ सप्टेंबर रोजी गोव्यातून ५० पोलीस काॅन्स्टेबलना पुण्यात पाठविले होते. तिथे त्यांना आठ आठवडे प्रशिक्षण देण्यात येणार होते. याच दरम्यान वरील पथकातील चार काॅन्स्टेबलांनी बेशिस्त वर्तन केल्याचे समोर आले. त्यानुसार, पहिला प्रकार ४ नोव्हेंबर रोजी घडला. संबंधित चार काॅन्स्टेबलना प्रशिक्षण केंद्राबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली होती. सायंकाळी ४ वाजेपर्यंत परत येण्याचे निर्देश होते. परंतु, ते निर्धारित वेळेपेक्षा तब्बल साडेसात तास उशिरा, म्हणजेच रात्री ११.३० वाजता परतले. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता प्रशिक्षणासाठी हजर राहणे अनिवार्य असताना, त्या चौघांनी दुपारी २.३० वाजता हजेरी नोंदवली आणि सकाळच्या सत्राला दांडी मारली.
​या घटनांची गंभीर दखल घेऊन १५ नोव्हेंबर रोजी एनडीआरएफच्या उपकमांडंटनी त्या चार जणांच्या खोल्यांची अचानक तपासणी केली. त्या तपासणीत त्यांच्या खोल्यांमध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून २४ तासांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. त्यांनी दिलेले स्पष्टीकरण असमाधानकारक होते. तसेच त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे एनडीआरएफ प्रशासनाने त्यांचे प्रशिक्षण रद्द करून त्यांना माघारी पाठविले. तसेच, गोवा पोलिसांना पत्र पाठवून या चारही कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस एनडीआरएफने केली आहे. त्यानुसार, गोवा पोलिसांनी त्यांच्याविरोधात खात्याअंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
कारवाई झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलांचे बेशिस्त वर्तन
१. चार काॅन्स्टेबलना प्रशिक्षण केंद्राबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली होती. दुपारी ४ वाजेपर्यंत परत येण्याचे त्यांना निर्देश होते; परंतु ते रात्री ११.३० वाजता परतले.
२. सकाळी ८ वा. प्रशिक्षणासाठी हजर राहणे अनिवार्य असताना, सकाळच्या सत्राला दांडी मारून चौघांनी दुपारी २.३० वाजता हजेरी नोंदवली.
३. एनडीआरएफच्या उपकमांडंटनी चौघांच्या खोल्यांची अचानक तपासणी केली. तेव्हा त्यांच्या खोल्यांमध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
४. ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून २४ तासांत स्पष्टीकरण मागितले होते. त्यांनी असमाधानकारक स्पष्टीकरण दिले आणि केलेल्या दाव्यांच्या समर्थनार्थ एकही पुरावा दिला नाही.

हेही वाचा
सर्व पहा