वाळपई : येथील जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रात येऊन संस्थेचे अध्यक्ष हनुमंत परब यांना गोळी घालण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील मूळ रहिवासी असलेल्या उमाशंकर विश्वकर्मा याच्याविरोधात वाळपई पोलीस स्थानकात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोशाळेच्या कार्यालयात येऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, कर्मचाऱ्यांसमोर दमदाटी करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.
नाणूस जय श्रीराम गोसंवर्धन केंद्राचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सदर संस्था वाळपई येथे कार्यरत असून गोसंवर्धनाच्या कार्यात संस्थेचा सहभाग आहे. सन २००८ पासून संस्थेच्या माध्यमातून गोसंवर्धनाचे काम सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.५५ वाजण्याच्या दरम्यान उमाशंकर विश्वकर्मा हा गोशाळेच्या कार्यालयात आला. त्यावेळी त्याने कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांसमोर अर्वाच्च भाषेत बोलण्यास सुरुवात केली. तसेच अध्यक्ष हनुमंत परब यांच्याशी वाद घातला.
अचानक कार्यालयात येऊन आपल्याला ओळखत नसल्याचे सांगून गोळी घालण्याची धमकी दिली. तसेच गोरखपूर येथील असल्याचे सांगत धमकीच्या स्वरूपात बोलल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेच्या वेळी गोशाळेतील कर्मचारी दिनेश पाटील, वासुदेव सरकळ व इतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर घटनेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चित्रीकरण झाले असून या घटनेशी संबंधित फुटेज उपलब्ध असल्याचेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गोसंवर्धनासारख्या सामाजिक आणि सेवाभावी कार्यात सहभागी असलेल्या संस्थेच्या कार्यालयात येऊन अशाप्रकारे दमदाटी करणे आणि गोळी घालण्याची धमकी देणे ही चिंतेची बाब आहे. संस्थेचे कामकाज सुरळीतपणे सुरू असताना अशा घटनांमुळे संस्थेच्या अध्यक्षांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
या प्रकरणी उमाशंकर विश्वकर्मा याच्याविरोधात तक्रार नोंदवून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांचे जबाब विचारात घेऊन सखोल तपास करावा, अशी मागणी हनुमंत परब यांनी वाळपई पोलिसांकडे केली आहे.


