आजोशी कोमुनिदाद भूमी घोटाळ्याप्रकरणी वीरेश बोरकरविरोधात एल्गार

मनोज परब, माजी आमदार सिल्वेरा, रामराव वाघ एकवटले;

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
आजोशी कोमुनिदाद भूमी घोटाळ्याप्रकरणी वीरेश बोरकरविरोधात एल्गार

पणजी : आजोशी परिसरातील सादिक दोडामणी याने केलेल्या कोमुनिदाद जमीन घोटाळ्याविरोधात आरजीपीच्या मनोज परब गटाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मनोज परब यांच्यासह सांत आंद्रेचे माजी आमदार फ्रन्सिस सिल्वेरा, रामराव वाघ, कॉंग्रेस पक्षाचे नेते मोहन धोंड इत्यादी वीरेश बोरकर यांच्याविरोधात एकत्र आले आहेत. या भूमी घोटाळ्यासंदर्भातील सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे ढकलली आहे.

आजोशी कोमुनिदाद कुळाच्या जम‌िनीत बिगर गोमंतकीय सादिक दोडामणी यांचे कुळ म्हणून नाव लागले आहे. बाहेरील व्यक्तीला कुळाची जमीन कशी मिळू शकते याविषयी आक्षेप घेऊन रामराव वाघ यांच्याहस स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात तक्रार केली होती. याविषयी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. पुढील सुनावणी १ डिसेंबर रोजी होणार आहे. याविषयी बोलताना आरजीपीचे नेते तुकाराम परब यांनी सांगितले की, गोमंतकीयांकडे जमीन घेण्याची परस्थिती राहिली नाही. त्यासाठी कोमु‌निदाद जमीन गोमंतकीयांना मिळावी, अशी आमची मागणी होती. आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमदार निवडून आणला. पण ती आता मोठी चूक ठरली आहे.

याविषयी मी बोरकर यांना खूप पूर्वी पासून सांगत आलो होतो, त्यासाठी त्यांचे समर्थक माझ्यावर नाराज होते. याच गावचे गोमंतकीय १८ वर्षे भाड्याच्या खोलीत राहतात. एक आशा ठेवून याच गोमंतकीयांनी बोरकर यांना निवडून आणले होते. पण हा टीशर्ट घालून इतर गावे वाचवण्याच्या नावाखाली रिल्स काढत आहे. ज्या आसगावच्या सरपंचाने गेल्या १० वर्षांत आसगावची दिल्ली केली त्याच सरपंचासोबत डोंगरावर जातो. त्याला निवडून आणले म्हणून लोकांची माफी मागतो असे मनोज परब यांनी सांगितले.

दोडामणीच्या मानशेचा विषय झाला तेव्हा आमच्या पक्षाच्या निरीक्षकाला बोरकर यांच्या घरी पाठवून जे काही चालले आहे ते बंद करण्यास सांगितले होते. त्याशिवाय पंचायतीचा पाठिंबा सुद्धा आम्ही काढून घेतला होता. आणि याच कारणामुळे मनोज परब त्यांना आवडेनासा झाला. यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल रामराव वाघ यांचे आभार व्यक्त करतो, असे परब म्हणाले.


ही जमीन सरकार दोडामणी यांच्याकडून काढून घेणार याचा मला विश्वास आहे. त्यातील ५ हजार चौ. मी. जमीन श्री नवदुर्गा देवस्थानला देण्यासाठी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्याकडे प्रयत्न करणार. राहिलेली जमीन आजोशी मांडूर आणि डोंगरी गावच्या स्थानिकांचे अर्ज येतात त्याप्रमाणे ती जागा त्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार, असे फ्रान्स‌िस सिल्वेरा यांनी सांग‌ितले. 

आजच्या सुनावणीला संबंधित प्रकरणातील वेगवेगळे पक्ष, त्यात संयुक्त मामलेदार, आजोशी कोमुन‌िदादचे कस्टोडीयन उपस्थित होते. त्यांनी गावच्या वतीने एक हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. याविषयी काही वेळ सुनावणी झाल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी आणखी थोडा वेळ मागून घेतला. आता पुढील सुनावणी १ डिसेंबरला सायंकाळी पुन्हा घ्यायची ठरवली आहे, अशी माहिती रामराव वाघ यांनी दिली. 

५ नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, ही टेनन्सी रद्द झाली आहे. त्यानंतर १/१४ उतारा पाहिल्यावर पूर्वीची नावे सादिक दोडामणीसह उताऱ्यात नव्हती. पण सध्या सुनावणी चालू आहे आणि पुढील सुनावणीची तारीख निश्चित झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे विधान केले आहे यावर त्याचा किती प्रभाव झाला आहे ते स्पष्ट नाही, असे वाघ यांनी सांगितले. 

याविषयी आमदारानेही पत्रव्यवहार केला आहे. पण याविषयी त्यांनी काय पाठपुरावा केला ते आम्हाला माहित नाही. पण आम्ही लोक एकामेकांच्या संपर्कात असून, या गोष्टीचा पाठपुरावा करत आहोत. आमदाराचा सहभाग कसा आहे ते आम्हाला माहीत नाही. याविषयी त्यांनीच स्पष्टीकरण दिल्यास चांगले, असे वाघ म्हणाले. 

हेही वाचा
सर्व पहा