काठमांडू : नेपाळमध्ये मंगळवारी सकाळी ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे जोरदार धक्के भारतासह नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि चीनच्या काही भागांत जाणवले. (5.3 Magnitude Earthquake Hits Nepal, Tremors Felt Across India, Bhutan, China.). भारतातील बिहार, मेघालय आणि पश्चिम बंगालमध्येही भूकंपाचे हादरे बसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. विशेषतः पश्चिम बंगालमधील उत्तर भागात उंच इमारती आणि घरांना हादरे बसल्याने अनेक नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घराबाहेर धाव घेतली.
अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेच्या (USGS) प्राथमिक माहितीनुसार, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७ वाजून २ मिनिटांनी भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील कोशी प्रांतातील लेलेप परिसरात होता. जमिनीखाली सुमारे २० किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र असल्याचे नोंदवण्यात आले.
दरम्यान, नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने या भूकंपाची तीव्रता ५.६ रिश्टर स्केल नोंदवली आहे. तप्लेजुंग जिल्ह्यातील ओलांगचुंग गोला परिसरात, नेपाळ-तिबेट सीमेजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे 'द काठमांडू पोस्ट'च्या वृत्तात म्हटले आहे.


