आरजीपीचे शाळेत जाण्याचे वय

लोकांचे प्रश्न न मांडता ते आपापसात भांडत आले आणि आज मनोज परब विरुद्ध वीरेश बोरकर असे दोन गट तयार झाले. निवडणुकीला फार तर तीन महिने आहेत. या तीन महिन्यांत पक्ष कोणाचा आणि कोण संपतो किंवा कोण पुढे राजकारणात यशस्वी होतो, ते येणारा काळच सांगेल. पण या पक्षाला अहंकाराची कीड लागली आहे, हे सत्य आहे.

Story: संपादकीय |
23rd November, 11:45 pm
आरजीपीचे शाळेत जाण्याचे वय

पहिल्याच निवडणुकीत गोव्यातील मतदारांनी इतर प्रस्थापित पक्षांपेक्षा जास्त पसंती दर्शवल्यामुळे गोव्याच्या राजकारणात प्रादेशिकत्व जपण्यासाठी पुढे या पक्षाची भरभराट होईल, असे २०२२ च्या निवडणुकीनंतर दिसत होते. आधी सुरळीत चाललेल्या गोष्टी पुढे पुढे मतभेदांमध्ये परिवर्तित होऊ लागल्या आणि पाहता पाहता आपण सर्वश्रेष्ठ असल्याचा भास या पक्षाच्या नेत्यांना होऊ लागला. तळागाळात जाऊन दोन-तीन हजार मते मिळवणे, हे काही फार मोठे कार्य नव्हते. प्रस्थापितांविरोधात कोणीही आश्वासक आवाज उठवला, तरी गोव्यात एवढी मते सहज मिळवता येतात. या पक्षाचेही असेच झाले. नावगाव नसलेल्या अनेकांना दोन-तीन हजार मतदारांनी कौल दिला. त्यातही एका ठिकाणी तर अशी लाट आली की तिथला ख्रिस्ती आमदार भाजपात गेल्यामुळे तिथे पर्याय म्हणून या पक्षाच्या उमेदवाराला लोकांनी स्वीकारले. मतांची टक्केवारी दहाच्या जवळपास पोहोचलेल्या या पक्षाला, ३८ उमेदवार उभे केल्यामुळे कदाचित मगो, गोवा फॉरवर्ड, तृणमूल, आम आदमी आणि राष्ट्रवादी या पक्षांपेक्षा जास्त मते मिळाल्याची शक्यता आहेच. पण तृणमूल आणि आपने जास्त उमेदवार देऊनही त्यांना मतांच्या टक्केवारीत या पक्षाच्या जवळपासही जाता आले नाही. त्यामुळे प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी आणि परप्रांतीयांविरोधात आवाज उठवलेल्या या पक्षाला जी मते मिळाली, ती शुद्ध गोवेकरांची होती. परप्रांतीयांच्या मतांचा त्यात जास्त सहभाग नव्हता, हेही खरेच आहे. त्यामुळेच पुढे हा पक्ष गोव्यातील आश्वासक आणि मजबूत प्रादेशिक पक्ष म्हणून समोर येईल असे दिसत होते. मात्र, एकमेकांच्या विरोधात काड्या करून पहिल्याच पाच वर्षांत पक्षाची शकले पडली. एक आमदार एका बाजूला आणि पक्षाची मुख्य फळी एका बाजूला झाली. यात पक्षाच्या मुख्य संस्थापकांपैकी एक जण राजकारणातून दूर झाल्याचेही चित्र उभे केले गेले आणि काही महिन्यांनंतर आता तीच व्यक्ती पुन्हा राजकारणात आली, त्यामुळे दोन्ही गटांतील वैर आणखी उफाळून आले आहे. गोव्याच्या राजकारणात महत्त्वाचे असलेले काही पक्ष या दोन्ही गटांना आपल्या हाताशी धरून आपल्याला हवे तसे राजकारण वळवू पाहतील, किंबहुना त्याची सुरुवातही झाली असेल. कारण पक्ष कोणाचा हा वादही आहेच. शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासारखे एक पक्षाचे दोन पक्ष किंवा दोन गट होतात, की एक गट दुसऱ्या राजकीय पक्षात विलीन होतो, ते नजीकच्या काळात कळणार आहे.

रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टी या राजकीय पक्षाची ही गोष्ट आहे. दोन्ही गटांतील नेत्यांना अहंकाराची इतकी बाधा झाली आहे की त्यांना मी मी म्हणण्यापलीकडे सध्या काहीही दिसत नाही. अशाने हा पक्ष पुन्हा विधानसभेत दिसेल की नाही, याबाबतही शंका आहे. आपण निवृत्ती घेतो, असे म्हणून पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणारे आणि त्यांच्यासोबत धायमोकळून रडणारे सगळे आता एका गटात आहेत. निवृत्ती घेतलेले मनोज परब पुन्हा आले आणि त्यांनी ज्या आवेशाने, ज्या आक्रमकतेने आमदार वीरेश बोरकर यांना लक्ष्य केले ते पाहता, हा पक्ष वाढण्याची शक्यता फार कमी आहे. हा सारा खटाटोप पक्ष वाढवण्यासाठी नव्हे, तर तो संपविण्यासाठीच सुरू आहे असे दिसते. “आपण वीरेश बोरकर यांना आमदार केले आणि आपणच त्यांना संपवू,” अशा प्रकारची भाषा मनोज परब वापरत आहेत. राजकारण करायचे असेल, तर ते मर्यादेत व्हायला हवे. एकमेकांची उणीधुणी काढण्याइतका हा पक्ष निश्चितच मोठा नाही. पक्षाचे वयच पाच वर्षांचे आहे. शाळेत जाण्याचे हे वय असल्यामुळे एकमेकांना संपविण्याची भाषा म्हणजे पोरकटपणाच आहे, हे काही वेगळे सांगायला नको. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत दहा टक्क्यांच्या आसपास आणि ९३ हजार मते मिळवणारा हा पक्ष पुढे जिल्हा पंचायत निवडणुकीतही ५७ हजार मते मिळवतो. हे पाहता त्यांच्या मतांच्या टक्केवारीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे पक्षाचे कामच गंभीर्याने सुरू ठेवले असते, तर २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही आरजीपीवर लोकांनी विश्वास दाखवला असता. लोकांचे प्रश्न सातत्याने मांडले असते, तर आज भाजपला पराभूत करण्यासाठी जी शक्ती कमी पडत आहे, ती आरजीपीने निश्चितच भरून काढली असती. मात्र, दुर्दैवाने आरजीपीच्या नेत्यांचा पोरकटपणा पक्षाच्या मुळावर आला आहे. लोकांचे प्रश्न न मांडता ते आपापसात भांडत आले आणि आज मनोज परब विरुद्ध वीरेश बोरकर असे दोन गट तयार झाले. निवडणुकीला फार तर तीन महिने आहेत. या तीन महिन्यांत पक्ष कोणाचा आणि कोण संपतो किंवा कोण पुढे राजकारणात यशस्वी होतो, ते येणारा काळच सांगेल. पण या पक्षाला अहंकाराची कीड लागली आहे, हे सत्य आहे.